मुंबई बातम्या

‘मिशन रफ्तार’ला पावसाळ्यानंतर गती; मुंबई- दिल्ली रेल्वे मार्गाच्या कामाचे कंत्राटदार नियुक्त – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः केंद्राच्या ‘मिशन रफ्तार’ योजनेनंतर्गत मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग १६० किमी प्रतितास या वेगाने करण्यासाठी पावसाळ्यानंतर वेगाने काम सुरू होणार आहे. या प्रकल्पातील १,२८१ कोटींच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्त कऱण्यात आले असून, यात ८० टक्के बांधकामाच्या निविदांचा समावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई-दिल्ली मार्गावरील ६० टक्क्यांहून अधिक रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार असून, त्यामुळे प्रवासवेळेत बचत होणार आहे.

कुंपण/भिंत उभारण्यासाठी ६०० कोटी

मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर सध्या १३० किमी प्रतितास या वेगाने रेल्वे धावत आहेत. हा मार्ग १६० किमी प्रतितास या वेगाकरिता अद्यावत करण्यात येणार आहे. यासाठी १,३८४ किमी मार्गावर काही ठिकाणी कुंपण, तर काही ठिकाणी भिंत उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर मार्गावरील पुलाच्या मजबुतीकरणासाठीही काम करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे हद्दीतील मुंबई सेंट्रल ते नागदादरम्यान भिंत/कुंपण बांधण्यासाठी ६०० कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

१५ तासांचा प्रवास १२ तासांवर

सध्या नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रलदरम्यानचा प्रवास १५ तास ३० मिनिटांचा आहे. १६० किमीने रेल्वे गाड्या धावत्या झाल्यावर हा प्रवास १२ ते साडेबारा तासांत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. या मार्गावरील ६० टक्क्यांहून अधिक गाड्यांचा वेग वाढणार आहे. यासाठी वजनाने हलक्या असलेल्या एलएचबी डब्यांच्या निर्मितीवर रेल्वे मंडळाचा भर आहे.

११ निविदांसाठी लवकरच कंत्राटदार

मुंबई-दिल्ली प्रकल्पासाठी ८० टक्के नागरी कामाच्या निविदासाठी कंत्राटदार निश्चित करण्यात आला आहे. एकूण ५६ विविध भागांमध्ये हे काम सुरू असून त्यापैकी ४५ विभागांचे निविदा काम पूर्ण झाले. उर्वरित ११ लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर या ठिकाणी वेगाने काम सुरू करण्यात येईल. मार्च २०२४पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

१८६ फाटक हटवणार

रेल्वे वेगाला अडथळा ठरू शकणाऱ्या १८६ रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी उड्डाणपूल (आरओबी) आणि भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. मार्गवरील वेगमर्यादा शिथिल करण्यासाठी रेल्वे रुळ, पूल, सिग्नलिंग आणि ओव्हर हेड उपकरणे अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. मुंबई-दिल्ली एकूण रेल्वे रुळ १३८४ किमी आहे. त्यापैकी ६९४ किमी हे पश्चिम रेल्वे हद्दीत आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-delhi-travel-time-to-be-reduced-by-30-as-railway-puts-route-on-fast-track/articleshow/93015928.cms