मुंबई बातम्या

मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भाग जलमय – Loksatta

मुंबई : मुंबई आणि उपनगरांत सोमवारी सायंकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भाग जलमय होण्यास सुरूवात झाली. मुंबईतील काही भागात मंगळवारी पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता. परिणामी, शीव, अंधेरीमधील भुयारी मार्ग, किंग्ज सर्कल, हिंदमाता, वडाळा, चेंबूर आदी भाग जलमय झालो होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पावसाने काहीशी विश्रांती घेतली आणि साचलेले पाणी ओसरायला सुरुवात झाली. मात्र, सकाळी पुन्हा पाऊस बरसू लागला आणि शाळा-महाविद्यालयात निघालेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.

पुढील चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर, पुढील २४ तासांत मुंबईत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज कुलाबा केंद्रातून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार, सोमवारी रात्री मुंबईत मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली.

विश्लेषण : पावसाळ्यात लोकल सेवा का कोलमडते?

विश्लेषण : पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी का साचते?

गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारी जोर धरला. सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडायला लागला. रात्रभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे दादर, हिंदमाता, किंग्ज सर्कल, लोअर परळ, शीव, धारावी, वांद्रे, कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, काळाचौकी, अंधेरी, दहिसर, बोरिवली, गोरेगाव, सांताक्रूझ यासह अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. सखलभागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी बसविलेले पाणी उपसा करणारे पंप मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले. परिणामी, पाण्याचा निचरा होऊ लागला.

पाहा व्हिडीओ –

[embedded content]

मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत (मागील २४ तासांत) सांताक्रूझमध्ये १२४.२ मिमी, कुलाब्यामध्ये ११७.४ मिमी, सीएसएमटी ९५ मिमी, भायखळा ९२.५ मिमी, चेंबूर ९९.५ मिमी, माटुंगा ०.५ मिमी, शीव ६६ मिमी, विद्याविहार ९९ मिमी, जुहू विमानतळ १०१.५ मिमी, मुंबई विमानतळ ९४ मिमी पावसाची नोंद झाली. शीव रस्ता क्रमांक २४ येथे अतिवृष्टी मुळे पाणी साचल्यामुळे बस मार्ग क्र. ३४१ ,४११ ,२२,२५ ,३१२ चे विद्यमान प्रवर्तन शीव रस्ता क्रमांक ३ मार्गे सकाळी 9.30 वाजल्यापासून परावर्तीत करण्यात आले आहे.

Source: https://www.loksatta.com/mumbai/heavy-rain-in-mumbai-waterlogging-in-low-lying-areas-mumbai-print-news-asj-82-3005521/