मुंबई बातम्या

पंढरपूर घाट सुरक्षित करा – मुंबई उच्च न्यायालय – Sakal

पंढरपूर घाट सुरक्षित करा

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : पंढरपूर येथील कुंभारघाट परिसरात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर घाट सुरक्षित करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. कुंभारघाट परिसरातील दुर्घटनेतील दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ॲड. अजिंक्य संगीतराव यांनी ॲड. राकेश भाटकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. यावर सुनावणीत हा निर्देश देण्यात आला.

यासंबंधित बांधकाम ठेकेदार व त्यांच्या कंपनीचा काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावा, तसेच नवीन टेंडर प्रक्रियेतून घाटाचे बांधकाम चांगल्या प्रकारे करण्यात यावे यासाठी याचिका करण्यात आली आहे. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी यावर सुनावणी झाली. आषाढी वारीसाठी देशभरातून पंढरपूर शहरात लाखो भाविक वारकरी येत असतात. अशा वेळी कुंभारघाटावर दुर्घटना घडल्यापासून प्रशासनाकडून यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. कुंभार घाट आहे त्या अवस्थेत तसाच आहे. मात्र १० जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीला कोणतीही अनुचित दुर्घटना घडू नये यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

न्यायालयाने याचिकेची दखल घेतली असून कुंभारघाट परिसरातील घाण, कचरा, डबर, दगडे यांची साफसफाई करण्यात यावी व योग्य ती उपाययोजना करावी, अशा तोंडी सूचना दिल्या आहेत. तसेच २७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सविस्तर माहिती द्यावी, असे निर्देश दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07142 Txt Mumbai

Source: https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi22b07142-txt-mumbai-20220624124251