मुंबई बातम्या

मुंबईतील कांजुरमार्ग करोना केंद्र पाडणार, महापालिकेचा निर्णय; हे आहे कारण – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून करोनारुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आवश्यकता नसलेली जम्बो करोना केंद्रे बंद करून तेथील साहित्य हलवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दहिसरपाठोपाठ आता कांजुरमार्ग केंद्र बंद करण्यात आले असून तेथील ऑक्सिजन प्लांट मुलुंड जकात नाका येथील जागेत हलवला जाणार आहे. तर, इतर वैद्यकीय साहित्य पालिका रुग्णालयांना दिले जाणार आहे. या कामासाठी प्रशासनाने बुधवारी निविदा मागवल्या आहेत.

मार्च २०२०मध्ये मुंबईत करोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णालयांतील खाटा अपुऱ्या पडू लागल्या होत्या. त्यावेळी राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएने शहर आणि उपनगरात संयुक्तपणे जम्बो करोना केंद्रे बांधली. या केंद्रांनी गेल्या दोन वर्षांत रुग्णसेवेत उत्तम कामगिरी बजावली आहे. आत्तापर्यंतच्या करोनाच्या तीन लाटा पाहता जम्बो केंद्राचे प्रचालन आणि देखभालीवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी केवळ १.९२ टक्के रूग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे पालिकेने गोरेगाव, दहिसर, कांजुरमार्ग आणि मुलुंड केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या केंद्रांतील औषधे, नियमित आणि विशेष अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, बायपॅप मशीन, मॉनिटर्स, आठ एलएमओ आणि रुग्णालयातील इतर उपकरणांची यादी तयार केली आहे. चार केंद्रांतील खाटांची क्षमता ८,२०० इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे २,२०० खाटा गोरेगाव येथील नेस्को केंद्रात आहेत. दोन महिन्यांपूर्वी हे केंद्र पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यापाठोपाठ पालिकेच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विभागाने बुधवारी कांजुरमार्ग येथील एक हजार खाटांचे केंद्र पाडण्याच्या कामासाठी निविदा मागवली आहे.

राज्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णांचं कारण समोर, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

भविष्यातील ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट

पालिकेची मुलुंड जकात नाक्यावर पुरेशी जागा असून सध्या ती वापरात नाही. कांजुरमार्ग येथील ४० मेट्रिक टन ऑक्सिजन प्लांट मोडून तो जकात नाका येथे स्थापित करण्यात येणार आहे. भविष्यात ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंगसाठी हा प्लांट वापरण्याचा प्रशासनाचा विचार आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टेन्शन वाढले! मुंबई, ठाण्यातील करोना रुग्णसंख्या वाढतीच; पाहा राज्यातील स्थिती

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-mumbai-kanjurmarg-covid-centre-closed-bmc-decision/articleshow/92242005.cms