मुंबई बातम्या

मुंबईत किमान तापमानाचा पारा २९ पार, उच्चांकी तापमानाची नोंद – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना रात्रीच्या वेळीही तापमान दिलासा फारसा मिळेनासा झाला आहे. वाढलेली आर्द्रता आणि रात्रभर जाणवणारी उकाड्याची स्थिती यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. सोमवार आणि मंगळवारच्या रात्री ही स्थिती अजूनच त्रासदायक जाणवली. मंगळवारी सकाळी सांताक्रूझ येथे २९.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. गेल्या १० वर्षांमधील मे महिन्यातील हे तिसऱ्या क्रमांकाचे उच्चांकी तापमान आहे. गेल्या आठवड्यातही किमान तापमानाचा पारा २९ अंशांपर्यंत पोहोचला होता.

सांताक्रूझ येथे मंगळवारी सकाळी २९.२, तर कुलाबा येथे २७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोमवारच्या ढगाळ वातावरणानंतर मुंबई शहरामध्ये काही ठिकाणी तुरळक सरींनी उपस्थिती लावली. त्यामुळे कुलाबा येथे ३.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरामध्ये मार्च महिन्यापासून पहिल्यांदाच ही पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रूझ येथे मात्र पावसाची नोंद झालेली नाही. मंगळवारी दिवसभर आभाळ ढगाळ होते. मात्र उपनगरांमध्ये पावसाची नोंद झालेली नाही. कुलाबा येथे २.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी कुलाबा येथे कमाल तापमान ३३.९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३४.५ अंश सेल्सिअस होते. मुंबईत किमान तापमानाचा पारा सातत्याने चढाच आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे असह्य उकाडा जाणवत असल्याचेही मुंबईकर सांगत आहेत. मुंबईमध्ये गेल्या १० वर्षांमध्ये या आधी २०१५ मध्ये २९.७, तर २०२० मध्ये २९.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. २०१६ मध्येही २९.२ अंश सेल्सिअसवर किमान तापमानाचा पारा पोहोचला होता. मे अखेरपर्यंत किमान तापमान हे २७ ते २८ अंशांदरम्यान किंवा अधिक असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

यंदा मुंबईमध्ये मार्च ते मे या कालावधीत पावसाची तूट नोंदली गेली आहे. १ मार्च ते मे अखेरच्या आठवड्यापर्यंत मुंबई शहरात ९.१ मिलीमीटर आणि मुंबई उपनगरात १२ मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद होते. २४ मे रोजी झालेला पाऊस लक्षात घेता मुंबई शहरामध्ये ७९ टक्के, तर मुंबई उपनगरामध्ये ९७ टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. मुंबई उपनगरात पावसाचा केवळ शिडकावा मुंबईकरांनी अनुभवला.

सिंधुदुर्गात अतिरिक्त पाऊस

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी वगळता रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाची तूट नोंदली गेली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात १०० टक्के तूट आहे, तर रायगड जिल्ह्यातही शिडकावा झाला आहे. त्यामुळे ९६ टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. सिंधुदुर्गात सरासरीपेक्षा ३८ टक्के अतिरिक्त, तर रत्नागिरी जिल्ह्यात १ टक्का अधिक पावसाची नोंद झाली आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-temperature-news-weather-update/articleshow/91776995.cms