मुंबई बातम्या

मुंबईत एसटीची धाव; मुंबई सेन्ट्रल, कुर्ला नेहरुनगर आगार गजबजणार – Loksatta

मुंबई : गेले पाच महिने विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांचेही अतोनात हाल होत आहेत. मुंबईतील फक्त परळ आगारातून एसटी सेवा सुरू होती. मात्र, मुंबई सेन्ट्रल आणि कुर्ला नेहरू नगर आगारातील बस सेवा बंदच होती. संपकरी कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू होत असून मुंबई सेन्ट्रल, कुर्ला नेहरु नगर आगारातून मुंबई महानगरासाठी गुरुवारपासून एसटी सुरू होत असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.
करोनाकाळातही मुंबई महानगरातून २०० हून अधिक एसटी गाडय़ा प्रवाशांसाठी सोडल्या जात होत्या. यामधून दररोज ४० ते ४२ हजार प्रवासी प्रवास करीत होते. संप झाल्याने एसटी सेवा बंद झाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने राज्य शासनाची मंजुरी घेऊन खासगी बस, शालेय बस, अन्य खासगी वाहनांना प्रवासी घेऊन जाण्याची मुभा दिली. गेल्या पाच महिन्यांत एसटीची सेवा सुरळीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे खासगी वाहनांबरोबरच, लोकल आणि परिवहन बसमधून प्रवास करण्याची सवय प्रवाशांना होऊ लागली आहे. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. महामंडळानेही २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्मचारी कर्तव्यावर हजर होत असून त्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुंबई विभागाकडून परळ आगारातून बस सुटत होत्या. तर पनवेल, उरण, ठाणे आगारातून मुंबईत बस येत होत्या. आता याची संख्या काहीशी वाढली आहे. परळ आगारातून दिवसाला चार बस सोडल्या जात असून त्याच्या १६ फेऱ्या होतात. उरण आगारातून १७ बसच्या ७० फेऱ्या, याशिवाय पनवेल आगारातूनही बस सुटत आहेत.
मुंबई सेन्ट्रल आणि कुर्ला नेहरु नगर आगारातूनही संपापूर्वी बस सोडल्या जात होत्या. या आगारातील कर्मचारी १०० टक्के संपावर असल्याने येथून एकही बस सुटू शकली नाही. कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू होऊ लागल्याने मुंबई सेन्ट्रल आणि कुर्ला नेहरु आगारातून गुरुवारपासून मुंबई महानगरातील विविध ठिकाणी पुन्हा बस सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
परळ आगारात सर्वाधिक कर्मचारी हजर
१९ एप्रिलपर्यंत कुर्ला नेहरु नगर आगारात १५१ कर्मचारी, मुंबई सेन्ट्रल आगारात १२७ कर्मचारी, परळ आगारात १९६, पनवेल आगारात १४२ आणि उरण आगारात १३२ कर्मचारी हजर झाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

Source: https://www.loksatta.com/mumbai/st-run-mumbai-mumbai-central-kurla-nehrunagar-depot-crowded-amy-95-2896484/