मुंबई बातम्या

“एका वर्षात मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करणार”; मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन – Loksatta

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला २०११ मध्ये सुरुवात झाली होती. २०२२ उजाडले तरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. भूसंपादनातील दिरंगाई, पर्यावरण विभागाच्या परवानग्यामध्ये आलेल्या अडचणी, निधीची कमतरता आणि ठेकेदारांचा कुचकामीपणा, राजकीय आणि प्रशासकीय उदासीनता यामुळे काम रखडलंय. या भागातील नागरिकांनाही काम पूर्ण न झाल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे, अशातच या महामार्गाचं काम एका वर्षात पूर्ण करण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय.   

एका वर्षात मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करणार, असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय. “मुंबई गोवा महामार्ग हा प्रकल्प ११ तुकड्यांमध्ये आहे. त्याचे बहुतेक प्रश्न सुटले असून लवकरच काम सुरू होईल. येत्या एक वर्षात मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे,” असं नितीन गडकरी म्हणाले.

मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडल्याचा सर्वाधिक त्रास कोकणातील नागरिकांना सहन करावा लागतो आहे. काम पूर्ण न झाल्याने वाहतुकीला अडचणी येतात. दरम्यान, आता खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी एका वर्षात या महामार्गाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे हे काम खरंच त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे वर्षभरात पूर्ण होतंय की नाही, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Source: https://www.loksatta.com/maharashtra/mumbai-goa-highway-construction-will-be-done-in-one-year-says-nitin-gadkari-hrc-97-2873288/