मुंबई बातम्या

मुंबई पुन्हा तापणार: एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान – MahaMTB

एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज

    दिनांक  01-Apr-2022 17:43:27

|

Heatwave


मुंबई (प्रतिनिधी) –
 
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात मुंबईचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि उपनगरात एप्रिल महिन्यातच मान्सूनपूर्व पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई सोबतच वायव्य तसेच मध्य भारत आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये एप्रिल महिन्यात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आधीच उष्माघाताचा सामना करणारे मुंबईकर उकाड्याने अधिक हैराण होणार आहेत. त्यामुळे मार्चमध्ये उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीनंतर कोकणपट्टीसाठी एप्रिल महिना हा अधिक उष्ण ठरणार आहे.

गुरुवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत ३२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती, तर किमान तापमान 22.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. हवामान विभागच्या सात दिवसीय अहवालानुसार, २ एप्रिलपासून मुंबईतील दिवसाचे तापमान ३७.२ अंश सेल्सियस असेल. तसेच शहरातील किमान तापमान २२-२५ अंश सेल्सियस दरम्यान असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तसेच एप्रिल महिन्यात मुंबई शहरात हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाजदेखील हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘ला निना’ चा प्रशांत महासागरातील प्रभाव एप्रिल अखेरीसपर्यंत कायम राहू शकतो.

‘ला निना’चा प्रभावदेखील लवकरच कमी होऊन, पावसाळ्याच्या सुरुवातीला ‘एल निनो सदर्न ऑसिलेशन’ (ENSO) ची सुरुवात होईल. पण मान्सूनसाठी कोणतेही ठोस अंदाज बांधणे खूप लवकर ठरेल. परंतु वातावरणीय परिस्थिती बघता पर्जन्यमान सामान्य राहील, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/4/1/Mumbai-s-temperature-likely-to-rise-in-April.html