मुंबई बातम्या

Mumbai Section 144: मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय, ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी; जाणून घ्या कारण – Maharashtra Times

मुंबई: मुंबई पोलिसांकडून शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचा आदेश (Section 144) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमता येणार नाही. याशिवाय, मोर्चा, मिरवणूक, वरात आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावरही मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर मुंबईतील कोणत्याही भाग ड्रोन उडवण्यासही पोलिसांनी मनाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या या निर्णयानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पोलिसांनी अचानक जवळपास २० दिवसांची जमावबंदी का लागू केली, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. परंतु, हा निर्णय केवळ मुंबईतील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, या निर्णयावर भाजपच्या नेत्यांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंधांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांचा नेमका आदेश काय?

१९५१ मधील अधिकारानुसार, पोलिस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी मुंबईच्या हद्दीत ८ एप्रिल २०२२ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केले आहेत. शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पॅराग्लायडर्स, बलून, पतंग उडवणे, उंच जाणारे फटाके तसेच लेसर प्रकाश (बीम) यास प्रतिबंध आधीच करण्यात आला आहे. २० फेब्रुवारीला या संदर्भात आदेश काढण्यात आले होते. २० एप्रिल २०२२ पर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कलम १४४ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

जमावबंदीचा नियम ‘या’ गोष्टींना लागू होणार नाही

मुंबईत ८ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या नियमातून काही गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, सहकारी संस्था आणि अन्य संस्थांच्या बैठका, क्लबमध्ये होणाऱ्या बैठकांना वगळण्यात आले आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या गर्दीवरही कोणतेही निर्बंध नसतील.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-police-imposed-section-144-in-a-city-till-8-april-2022/articleshow/90303968.cms