मुंबई बातम्या

मुंबई : विद्यापीठ प्रशासन नरमले, सिनेट होणार ऑफलाईनच | Mumbai University update – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) वार्षिक अधिसभेचे १५ मार्च रोजी होणारे सिनेटचे अधिवेशन (senate session) ऑफलाईनच होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने नरमाईची भूमिका घेत आपला निर्णय जाहीर केला आहे. सिनेटचे अधिवेशन ऑनलाईन (offline) पद्धतीने घेण्याची तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून (Mumbai university Authority) घेण्यात आली होती. त्याला युवा सेनेच्या सिनेट सदस्यांसोबत बुक्टो आणि प्राध्यापक संघटनेच्या सदस्यांनी जोरदार विरोध सुरू केला होता. विद्यापीठ प्रशासनाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला होता.

हेही वाचा: राजकीय संघर्षाचा ठाण्यात शिमगा; नोटिशीची दहा ठिकाणी होळी करून आंदोलन

बुक्टोने अधिवेशन ऑनलाईन झाले तर आमचे सदस्य दीक्षांत सभागृहात जाऊन बसतील आणि आपला निषेध व्यक्‍त करतील, असा इशारा दिला होता. त्यामुळे विद्यापीठाने सर्व विरोध लक्षात घेऊन १५ मार्च रोजी होणारे सिनेटचे अधिवेशन प्रत्यक्षात ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिनेट, व्यवस्थापन परिषद आणि प्राध्यापक संघटनेच्या सदस्यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. सिनेटचे अधिवेशन १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता फोर्टमधील सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात होणार आहे.

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर पूर्वी अधिवेशनाचे आयोजन आभासी पद्धतीने करण्यात आले होते. मात्र, आता निर्बंध शिथिल झाल्यामुळे नियमांचे पालन करून प्रत्यक्ष पद्धतीने बैठक घेण्यात येईल.

– सुधीर पुराणिक, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-university-senate-session-will-be-offline-mumbai-university-update-nss91