मुंबई बातम्या

कलादालनांच्या जगतात – Maharashtra Times

राजेंद्र पाटील

सन १९३०च्या दशकातदेखील मुंबईत कलादालने अस्तित्वात होती, असे १९३५मध्ये प्रकाशित झालेल्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या आर्ट जर्नलच्या अंकात नमूद केलेले आढळते. मुंबईतील पहिले छोटेखानी सार्वजनिक कलादालन म्हणजे बॉम्बे आर्ट सोसायटीचे रामपार्ट रो, काळाघोडा येथील सन १९३९मध्ये घेतलेले ऑफिसवजा कलादालन म्हणता येईल. तेथे प्रदर्शने होत असत व याच कलादालनात हुसेन, सुझा, रझा, आरा, गाडे व बाकरे यांचा समावेश असलेल्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे पहिले प्रदर्शन १९४९मध्ये झाले होते. सोसायटीच्या या कलादालनाचे नाव पुढे आर्टिस्ट सेंटर असे झाले.

खऱ्या अर्थाने मुंबईला लाभलेले पहिले मोठे सार्वजनिक कलादालन म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरी. जहांगीर आर्ट गॅलरीचे उद्घाटन जानेवारी १९५२मध्ये तत्कालीन बॉम्बे राज्याचे मुख्यमंत्री बी. जी. खेर यांच्या हस्ते झाले होते. समाजकार्यात अग्रेसर असलेले, कलाप्रेमी उद्योगपती सर कावसजी जहांगीर हे १९३६मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे पहिले भारतीय अध्यक्ष झाले. त्यावेळी सोसायटीच्या १९३५च्या आर्ट जर्नलमध्ये मुंबईला एका मोठ्या आर्ट गॅलरीची गरज आहे, यावर मोठा लेख लिहिला गेला होता. सर कावसजी जहांगीर यांनी त्यावेळचे बॉम्बे आर्ट सोसायटीचे सचिव बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक यांच्या मदतीने सरकारकडून आर्ट गॅलरीसाठी जागा मागितली. प्रिन्स ऑफ वेल्स मुझियमच्या बाजूला मिळालेल्या जागेवर गॅलरी बांधण्यासाठी सर कावसजी जहांगीर यांनी स्वत: त्यावेळी चार लाख रुपये दिले व तेथे भव्य कलादालन बनविले. त्या कलादालनाला त्यांच्या दिवंगत मुलाच्या स्मृत्यर्थ ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ हे नाव देण्यात आले. आज जहांगीर आर्ट गॅलरी संपूर्ण भारतात प्रसिद्ध असून, तेथे प्रदर्शन भरवायला चार ते पाच वर्षांची प्रतीक्षा यादी असते. जहांगीर कलादालनात प्रदर्शन भरविणे हे फक्त प्रतिष्ठेचेच नसून, कलावंतांच्या सृजनशीलतेला मिळणारे ते शिक्कामोर्तबच मानले जाते. सुरुवातीपासूनच जहांगीर कलादालनात भारतातल्या सर्व प्रसिद्ध चित्रकारांनी प्रदर्शने भरवलेली आहेत व आजही भरवत असतात. चित्रकार, शिल्पकार, कलासमीक्षक, विचारवंत, कला इतिहासकार यांची वर्दळ आजही तेथे पाहायला मिळते.

पन्नासच्या दशकात जहांगीर कलादालन सुरू झाल्यानंतर साठच्या दशकात दोन वेगवेगळ्या फ्रेमिंग शॉप्सनी दृश्यकलेचा वाढता आलेख हेरून, फोर्ट व काळा घोडा परिसरात दोन कलादालने सुरू केली. ती म्हणजे काली पंडोल यांची फ्लोरा फाउंटन येथील पंडोल आर्ट गॅलरी (१९६३) व जहांगीर आर्ट गॅलरीच्या पहिल्या मजल्यावरील केकू गांधी यांनी सुरू केलेली गॅलरी केमोल्ड (१९६३). आज ही दोन्ही कलादालने भारतातील आघाडीची कलादालने म्हणून ओळखली जातात. दादिबा पंडोल यांनी पंडोल आर्ट गॅलरीचे रूपांतर २०११मध्ये ‘पंडोल्स’ या नावाने लिलावगृहात केले; तर गॅलरी केमोल्ड जहांगीरच्या पहिल्या मजल्यावरून फोर्टमधल्या प्रीस्कॉट रोडवर आली व ‘केमोल्ड प्रीस्कॉट रोड’ असे तिचे नवे नामकरण झाले. नंतर सत्तरच्या दशकात फिरोजा गोदरेज यांनी भुलाभाई देसाई रोडवर सिमरोझा आर्ट गॅलरीची मुहूर्तमेढ रोवली. अलीकडेच पाच दशकांचा त्यांचा यशस्वी प्रवास रणजित होस्कोटे यांनी क्युरेट केलेल्या ‘सिमरोझा क्रॉनिकल्स १९७१-२०२१’ या प्रदर्शनाद्वारे साजरा केला गेला.

जमनालाल बजाज सेवा ट्रस्टतर्फे नरीमन पॉइंट येथे ऐंशीच्या दशकात स्थापन केलेली बजाज आर्ट गॅलरी (१९८०) व नव्वदच्या दशकात वरळीला सुरू झालेली नेहरू सेंटर आर्ट गॅलरी (१९९२), अशा दोन सार्वजनिक कलादालनांची मुंबईच्या कला-नकाशात भर पडली व कलावंतांना परवडेल अशा जहांगीर कलादालनासारख्या आठवड्याला भाडेतत्त्वावर माफक दरात मिळणाऱ्या मुंबईतील सार्वजनिक कलादालनांची संख्या आर्टिस्ट सेंटर धरून चार झाली.

सन १९९०मध्ये जाहीर झालेल्या खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणाचे पडसाद कलाक्षेत्रातही उमटले. नव्वदच्या दशकात मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात भरपूर कलादालनांची भर पडली. त्यात गीता मेहरांनी परळ येथे सुरू केलेली साक्षी गॅलरी (१९९५), प्रविणा मेक्लाई यांनी सुरू केलेली जमात आर्ट गॅलरी (१९९९), शांती चोप्रा यांनी कुलाब्याला स्थापन केलेली आर्ट म्युझिंग (१९९९) ही प्रमुख कलादालने म्हणून उल्लेखनीय आहेत. ही कलादालने देशातील तरुण चित्र-शिल्पकारांसोबत आघाडीच्या चित्रकारांची प्रदर्शने आजही भरवत असतात. नव्वदच्या दशकातच राष्ट्रीय आधुनिक कला दालन (१९९६) सर कावसजी जहांगीर हॉलमध्ये सुरू झाले.

या काळात मुंबईत जशी भरपूर कलादालने सुरू झाली, तशी त्यातील बरीच कलादालने बंदही झाली. त्यानंतर नवीन कलादालने सुरू होणे व बंद होणे हे आजतागायत सुरूच आहे. मूलत: हुसेन किंवा गायतोंडे यांचे चित्र २५ ते ३० कोटी रुपयांना लिलावगृहात विकले जाते म्हणजे कलाक्षेत्रात भरपूर पैसा आहे, अशा समजातून तो कमविण्याच्या उद्देशाने कलादालन सुरू केले, तर ते कलाक्षेत्रात फार काळ टिकत नाही, असे दिसून आले आहे. कलाबाजाराची अनिश्चितता, कलाबाजारात लागणारा अमाप संयम, काही अलिखित ठोकताळे व एकूणच कला विक्रीचे शास्त्र (जे कोणत्याही कला, वाणिज्य किंवा व्यवस्थापकीय महाविद्यालयात शिकविले जात नाही.) व कलेला फक्त क्रयमूल्य नसून त्यात कलामूल्य आहे, हे ज्यांना समजले किंवा ज्यांनी समजून घेतले, अशाच व्यक्ती कलादालन यशस्वीपणे चालवू शकल्या. त्या कलादालनांनी कलाक्षेत्रात खरोखर मोलाची भूमिका बजावली व बऱ्याच चित्र-शिल्पकारांच्या कारकिर्दी घडविल्या (त्यांनी त्यासोबत पैसे कमविलेही असतील, पण तो त्यांचा मुख्य उद्देश नव्हता). येथे बंद झालेल्या मोठमोठ्या कलादालनांचा तपशील मुद्दामहून देत नाही.

पुढे २०००च्या दशकात फोर्ट-कुलाबा परिसरात चटर्जी अँड लाल या दाम्पत्याने सुरू केलेली ‘चटर्जी अँड लाल’ नावाचीच गॅलरी (२००३), विभू कपूर यांची गॅलरी बियाँड (२००४), श्री गोस्वामींनी सुरू केलेली प्रोजेक्ट ८८ (२००६), गॅलरी मिरचंदानी + स्टाइनरुके (२००६), अभय मस्करांनी सुरू केलेली गॅलरी मस्करा (२००६), तुषार जीवराजका यांची वोल्ट गॅलरी (२००९), अर्शिया लोखंडवाला यांची लकिरे (२००९) आदी कलादालने आजही नवनवीन प्रयोग करत असतात. याच काळात वरळीला तीन कलादालने सुरू झाली, ती म्हणजे कल्पना शहांची ताओ आर्ट गॅलरी, तराना खुबचन्दानी यांची आर्ट अँड सोल व प्रियश्री पतोडीया यांची प्रियश्री आर्ट गॅलरी, जेथे वैविध्यपूर्ण अशी प्रदर्शने आजही भरवली जातात.

गेल्या दशकातदेखील बरीच नवी कलादालने सुरू झाली. त्यात, झवेरी कंटेंपररी, बोधना, टर्क, दिल्ली आर्ट गॅलरी, गॅलरी इसा, मेथड, आकारा, आदी आर्ट गॅलरीज् उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्र सरकारने बॉम्बे आर्ट सोसायटीला वांद्रे रेक्लमेशन येथे दिलेल्या जागेवर सोसायटीने तीन भव्य कलादालने बनविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या कलादालनांचे २०१६मध्ये उद्घाटन झाले व मुंबईच्या सार्वजनिक कलादालनांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली.

(लेखक बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष आहेत.)

Source: https://maharashtratimes.com/editorial/column/kalthase/even-in-the-1930s-art-galleries-existed-in-mumbai/articleshow/89737199.cms