मुंबई बातम्या

मुंबईच्या बखरकार – Maharashtra Times

संजीवनी खेर

उत्साहाने, चैतन्याने सळसळणाऱ्या शारदा मुंबईच्या बखरकार होत्या, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण त्यांना या महानगराबद्दल प्रेम होते, आस्था होती. वसाहतकालीन आणि पुरातन वास्तूंविषयी प्रेम होते. तसे आपल्या सर्वांनाच असते. आमची मुंबई कशी ग्रेट आहे, अशी शेखी आपण मिरवतही असतो. पण चार गोष्टी सांगा म्हटले, तर आपण गोंधळून जातो. पण शारदा मात्र या प्रश्नाचे उत्तर आपल्या अथक प्रयत्नाने आणि अचूक नियोजनाने आपल्या समोर ठेवत असत. फुकटचा अभिमान काय कामाचा? हा घ्या पुरावा असे म्हणत अविश्रांत बौद्धिक श्रम करत ती पुस्तक सिद्ध करत असे आणि समोर ठेवत असे. त्यांचे मुंबईचे प्रेम हे बोलघेवडे नव्हते. ज्या वेगाने त्या कामे करत, पुस्तके लिहित की आम्ही चकित व्हायचो. तुम्हालाही दिवसाचे २४ तासच मिळतात ना? मग घर संसार सांभाळून तुम्ही हे कसे जमवता? यावर फक्त त्या हसत असत. कारण आपण बाणगंगा परिसराच्या इतिहासाने मुग्ध होत असू तोवर त्या पुढच्या ‘मुंबई, सिटिज विदीन’सारख्या मोठ्या प्रकल्पामध्ये गर्क झालेल्या असत.

चर्चगेट परिसरात राममहलमध्ये त्या राहत. त्या काळात आम्हीही स्टेट बँकेच्या अपार्टमेंट्समध्ये त्या भागातच राहत होतो. अभिजनात वावरणाऱ्या शारदा जोशी-त्रिवेदी यांच्यात अस्सल मराठी चिवटपणा होता. मुख्य म्हणजे, कामाला दिशा नि शिस्त होती. सुखवस्तू कुटुंबात वाढलेल्या शारदा यांचे वडील नेहरू यांच्या काळात दिल्लीत पहिले सचिव होते. मावशीचे यजमान करमरकर हे रिअर अॅडमिरल होते. म्हसकरांकडील आजोळचे घर दादर माटुंगा भागात. आई समाजकार्यात रस घेणाऱ्या. मर्ढेकरांसारख्या कवी, लेखकांचे घरी येणे जाणे. हे सारे देण्याचा उद्देश त्यांची जडणघडण कळावी म्हणून. वास्तविक या सगळ्या वातावरणात त्यांनी अभिजनांच्या वर्तुळात ऐशारामात, पोषाखीपणात राहावे, पार्ट्या-गप्पा यात वेळ घालवावा, हे साहजिक ठरले असते. त्यात काही गैरही नव्हते. पण त्यांना पिसे लागले होते दस्तावेजीकरणाचे. या संबंधांचा वापर त्यांनी एशियाटिकसाठी राजेशाही वस्तूंचे प्रदर्शन भरवले होते. किंमती डिनर्स आयोजित करून मुंबईच्या अभिजनांकडून बराच निधी गोळा केला होता. बाळ मुंडकुरांसारख्यांना हाताशी धरून फॅशन शो आयोजित करून तो पैसा मुंबईच्या सुंदर परिसरासाठी वापरला होता. त्यांचा सारा लेखन प्रवास हा मुंबईशी निगडित अनेक शोधांचा प्रवास होता. मग त्या गतवैभवाच्या खुणा बाळगणाऱ्या राजघराण्यांतील प्रथा परंपरांच्या असोत की, वसाहतकालीन मुंबईच्या वैशिष्ट्यांचे. वडिलांनी संस्थाने खालसा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने त्यांना कुठल्याही राजमहालातील अंत:पुरातही सहज प्रवेश होता. त्यातून त्यांची तीन पुस्तके सिद्ध झाली. नुसते कौतुक वा गौरवीकरण नाही, तर त्यांच्या परंपरा रितीरिवाज, सण-समारंभ, राजा-राणीची घडण यांचे सारे यथातथ्य चित्रण आहे.

मुंबईच्या बखरकार म्हणण्याचे कारण त्यांनी केलेली मुंबई परिसराची अभ्यास नि मांडणी. आपल्याला आपल्या महानगराच्या रूपाचा त्यांनी आरसा दाखवावा तसे प्रतिबिंब दाखवले. राहुल मेहेरोत्रा बाणगंगाचे सहलेखक आहेत. मुंबईवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. उदाहरणेच द्यायची तर, बॉम्बे हिस्ट्री आर्ट अँड आर्किटेक्चर, बॉम्बे सिटीज विदिन (एका मुंबईतील अनेक गावांचा इतिहासच जणू), फोर्ट वॉक्स, अराऊंड बॉम्बे फोर्ट एरिया, अँकरिंग ए सिटी लाइन द डिस्टिक्ट ऑफ वेस्टर्न सबर्बन रेल्वे अँड इट्स हेडक्वारटर्स इन बॉम्बे, द जहांगीर गॅलरी, प्रेमचंद रायचंद हिज लाइफ अँड टाइम्स, बॉम्बे आर्ट डेको, ताज अॅट अपोलो बंदर ही त्यांची मुंबईचे ब्रिटिश कालीन आणि प्राचीन वैभव टिपणारी पुस्तके. फोर्ट भागात आजही गेले की अनेक इमारती आपल्या वेगळेपणाने लक्ष वेधून घेतात. अचंबित व्हावे असे त्यांचे भव्य रूप, भोवताल, उपयोगिता यांनी आपण भारावून जातो. नेमके तेच त्यांनी हेरले. त्या इमारती म्हणजे केवळ भव्यतेचे नमुने नाहीत, तर पाश्चात्य आणि भारतीय वास्तूकलेचे संगम आहेत. त्याचे दस्तावेजीकरण केले नाही तर पुढच्या पिढ्यांपर्यंत त्या टिकतील की नाही, याचीची खात्री नाही. या धास्तीने मग कॉरपोरेशनच्या मदतीने हेरिटेज कमिटी स्थापन झाल्यापासून शारदा त्याच्या सदस्य होत्या. अनेक प्रकल्प घेऊन हे लोक काम करीत होते. अजूनही करतात. पण पाया तेव्हा घातला गेला होता. मुळात कॉर्पोशन बिल्डिंग, बोरीबंदर स्टेशन, सभोवतालच्या इमारती फोर्ट भागातील अनेक बँकांच्या इमारती, हॉर्निमन सर्कलच्या भोवतालच्या इमारती, एशियाटिक सोसायटी, त्यांची रचना, त्यांची देखभाल, पाण्याच्या झिरपण्याने होणारे दुष्परिणाम यांकडे लक्ष देणे गरजेचे होते आणि आहे. आज ज्या गतीने मुंबई वाढतेय ते पाहता या इमारतींचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. तेव्हा नागरिक जागरूक असतील, त्यांना माहिती असेल तर हे सोपे होऊ शकते. त्यासाठी मोठ्या निधीची गरज असते हे सारे ध्यानात घेऊन मुळात आर्ट डेको म्हणजे काय? हे वसाहतवादी सत्तेचे परिणाम दाखवणारी चिन्हे महत्त्वाची आहेत का नि कशी? हे समजावून सांगण्याचे, तरुणांना त्या भागात नेऊन पोर्ट म्हणजे कसा किल्ला होता हे समजावणे शारदा यांनी केले. त्या जेव्हा एखाद्या इमारतीचा अभ्यास मांडायच्या, तेव्हा वाचनालय हा त्यांचा पहिला आधार असायचा. ताजवर काम करताना त्यांना या इमारतीचे मूळ आराखडे मिळाले. पण त्यावरील एक सही डीएम मिर्झा यांची होती. पण, दुसरी मुळीच ओळखता येत नव्हती. कदाचित एखाद्या ब्रिटिश आर्किटेक्ट अधिकाऱ्याची असेल असा अंदाज येत होता. पण एक दिवस एक गृहस्थ येऊन त्यांना म्हणाला, माझ्या आजोबांनी याचे डिझाइअन बनवले होते! त्यांचे नाव रावबहादूर सीताराम खंडेराव वैद्य! त्याकाळी त्यांना २ लाख रुपये दिले गेले होते.! त्यानंतर असे लक्षात आले की किती तरी इमारतींचे मास्टर इंजिनिअर म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले होते. ताजवरचे पुस्तक बरेच रेंगाळले होते. अखेर २००७च्या बॉम्ब हल्ल्यानंतर जे मुंबईचे स्पिरीट नि हिंमत दिसली; त्यांनी रतन टाटांना फोन करून ते पुस्तक लवकरात लवकर प्रकाशित करायची विनंती केली. त्यात ह्या हल्ल्याच्या घटनेवरही एक प्रकरण जोडले गेले. त्यावेळी चार्ल्स कोरिया म्हणाले होते की ‘बॉम्बे (मुंबई) इज लकी टू हॅव द ग्रेटेस्ट क्रॉनिकलर इन शारदा द्विवेदी, दॅट इंडियन सिटी हॅज एव्हर हॅड’

त्यांचे मला आवडते ते ‘बाणगंगा सेक्रेड टँक’ हे राहुल मेहेरोत्रांसह लिहिलेले पुस्तक. या परिसराचा पौराणिक इतिहास, भौगोलिक स्थान त्याचे इतर स्थांनाशी असलेले धार्मिक आणि भावनिक नाते. त्या तलावाभोवती असणारी अनेक मंदिरे, त्यांचा इतिहास, तलावापर्यंत नेणाऱ्या पायऱ्या सारी रचनाच वेधक आहे. त्यात भोवताली येणाऱ्या उंच इमारतींमुळे राडा रोडा जात होता. जलाचे स्रोत बंद होऊ पाहत होते. त्याचे सौंदर्य फिके पडत होते. महाराष्ट्र पर्यटन विभागाची मदत घेऊन तिथे संगीताचे कार्यक्रम केले. एक अलौकिक वातावरण तयार झाले होते. त्यासाठी परिसराचे महत्त्व समजावले गेले होते.

अशीच एक संकल्पना होती काळाघोडा उत्सवाची. तो सारा परिसर हजारो लोक रोज तुडवत असतील. पण त्या रस्त्यांवर आपल्या ग्रामीण अस्सल कला, वस्तू मांडल्या गेल्या, इन्स्टॉलेशन्स झाली, म्युझियम, जहांगिर गॅलरी, रिदम हाऊस अशा अनेक देखण्या इमारतींकडे सामान्य नागरिकांची पावले पडू लागली. नजरा हा आपला वारसा निरखू लागली. इतकी की शनिवार, रविवारी चालायला जागा नसे. या सगळ्यात त्यांचा सिंहिणीचा वाटा होता. त्यांच्यासारखी मैत्रीण असणे जीवन समृद्ध करते.

Source: https://maharashtratimes.com/editorial/column/kalthase/bakharkar-of-mumbai-sharda/articleshow/89051312.cms