मुंबई बातम्या

मुंबईत करोना रुग्णसंख्येत वाढ – Loksatta

नोव्हेंबरपासून कमी झालेला करोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापासून पुन्हा वाढताना दिसत आहे.

बाधितांचे प्रमाण एक टक्क्याहून अधिक

शैलजा तिवले

मुंबई : नोव्हेंबरपासून कमी झालेला करोनाबाधित रुग्णसंख्येचा आलेख डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापासून पुन्हा वाढताना दिसत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ाच्या तुलनेत या आठवडय़ात नव्याने आढळणाऱ्या रुग्णसंख्येत १६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच बाधितांचे प्रमाणही एक टक्क्याच्याही वर गेले आहे.

मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ऑक्टोबरपासून कमी झाला असला तरी दैनंदिन रुग्णसंख्येचे प्रमाण नोव्हेंबरपासून कमी होऊ लागले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात प्रतिदिन साधारणत: अडीचशे रुग्णांची दरदिवशी भर पडत होती. या महिन्याच्या उत्तरार्धात मात्र यात घट होत हे प्रमाण २०० पर्यंत खाली आले होते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासून यात हळूहळू वाढ व्हायला लागली. डिसेंबरच्या तिसऱ्या म्हणजेच गेल्या आठवडय़ात तर हे प्रमाण अडीचशेच्याही वर गेले आहे. रविवारी मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येने तीनशेचा टप्पा पार केला आहे.

१ ते ७ डिसेंबर या काळात १,१८९ नव्या रुग्णांचे निदान झाले होते. ८ ते १४ डिसेंबर दरम्यान रुग्णांत वाढ होऊन १,२२४ रुग्णांची भर पडली. १५ ते १९ डिसेंबर या पाच दिवसांत १,३९१ रुग्णांचे निदान झाले आहे. पहिल्या आठवडय़ाच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास १६ टक्क्यांनी वाढले आहे. शहरातील बाधितांचे प्रमाण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात ०.७० टक्के म्हणजेच एक टक्क्यांपेक्षाही कमी होते. परंतु गेल्या आठवडय़ात हे प्रमाण एक टक्क्यांहून अधिक झाले आहे.

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

  • गेल्या काही दिवसांमध्ये शहरात अचानक गारवा वाढल्यामुळे अन्य विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ताप, सर्दी, खोकला ही करोनासारखी लक्षणे असली तरी बहुतांश रुग्णांमध्ये अन्य विषाणूजन्य आजारांचे प्रमाण अधिक आढळत आहे.
  •   गेल्या आठवडाभरात श्वसनाचे आजार, डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी आणि खोकल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. करोनासारखी लक्षणे असल्यामुळे संशयित म्हणून या रुग्णांच्या चाचण्या करण्यात येतात. परंतु यात एखादाच करोनाचा रुग्ण आढळत असून अन्य सर्व रुग्णांना इतर विषाणूजन्य आजार झाल्याचे दिसून येत आहे, असे कूपर रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. नीलम रेडकर यांनी सांगितले.
  • मागील काही दिवसांमध्ये शहरातील तापमान कमी झाले असून हवेतील गारवा वाढला आहे. वातावरणीय बदल होण्याची स्थिती विषाणूजन्य आजारांच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे या काळात अन्य विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो.
  •   गारवा वाढल्यामुळे अस्थमा किंवा अन्य श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांचा त्रास वाढला आहे. तापासह अशा अन्य विषाणूजन्य आजारांची बाधा होण्याचे प्रमाण जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्याची माहिती फॅमिली फिजिशियन डॉ. केतन मेहता यांनी दिली.

आतापर्यंत आढळलेले ओमायक्रॉनचे रुग्ण हे आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनचा प्रसार समाजामध्ये झाला आहे असे वाटत नाही. संसर्ग रोखण्यासाठी आता नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आदेशही दिले आहेत. नाताळ आणि नववर्षांच्या जल्लोषानंतर १५ जानेवारीपर्यंत संसर्ग प्रसार कसा आणि कितपत होत आहे, याचे चित्र स्पष्ट होईल.

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/mumbai/increase-corona-patients-mumbai-ysh-95-2727465/