मुंबई बातम्या

मुंबई काँग्रेसची नामुष्की – Maharashtra Times

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या शिवाजी पार्क येथील नियोजित सभेच्या परवानगीसाठी न्यायालयात धाव घ्यावी लागल्याने मुंबई काँग्रेस तोंडघशी पडली आहे. या निर्णयाविरोधात राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता दिल्लीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचे कान टोचल्याची माहिती आहे. या सर्व प्रकारामुळे पक्षाचे ओढवलेली नामुष्की रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी तूर्तास राहुल यांची सभा मुंबईत घेण्यास नकार कळविल्याचे समजते.

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे २८ डिसेंबर रोजी राहुल गांधी यांची सभा होणार होती. या सभेच्या परवानगीसाठी राज्य सरकारकडून दाद न मिळाल्याने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यातील कोणत्याही मोठ्या नेत्याला विश्वासात न घेता जगताप यांनी हे पाऊल उचलले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनाही या संदर्भात कल्पना देण्यात आली नव्हती. राज्यातील सत्तेत काँग्रेस पक्ष सहभागी असतानाही जगताप यांनी न्यायालयात धाव घेतल्याने महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या निर्णयाचे पडसाद दिल्लीतही उमटले. परिणामी, न्यायालयात दाखल केलेली याचिका २४ तासांच्या आत मागे घ्यावी लागली.

कोणाशीही चर्चा न करता थेट न्यायालयात जाण्याच्या निर्णयामुळे दिल्लीतील नेत्यांनीच ही सभाच रद्द करण्याची ताकीद मुंबई काँग्रेसल्या दिल्याचे कळते. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना राहुल गांधी यांची सभा महत्त्वाची मानली जात होती. या सभेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची संधी पक्षाला होती. मात्र आता ही संधी गमाविल्याने मुंबई काँग्रेसमधीलच अनेक नेते नाराज झाल्याचे कळते.

शिवसेनाही नाराज

महाराष्ट्र विकास आघाडीत काँग्रेस हा महत्त्वाचा घटक असताना ही मुंबई काँग्रेसने सभेच्या परवानगीसाठी थेट न्यायालयाचे दार ठोठावल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनादेखील नाराज झाल्याचे कळते. या प्रकरणी शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांनी थेट दिल्लीत फोन करून नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/run-to-court-for-permission-for-rahul-gandhis-planned-meeting-at-shivaji-park/articleshow/88330274.cms