मुंबई बातम्या

मुंबई लोकलचे डिजीटल तिकिट कधी मिळणार?; प्रवासी हैराण – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी,मुंबई

करोना लाट नियंत्रणात आल्याने सामान्य लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यादेखील करोना-पूर्व वेळापत्रकानुसार धावत आहेत. मात्र या रेल्वेगाड्यांतून प्रवास करण्याकरिता तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना केवळ तिकीट खिडक्यांचाच पर्याय आहे. मोबाइलसह अन्य सर्व पर्यायांद्वारे डिजिटल तिकीट विक्री बंदच असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

करोनापूर्वी एटीव्हीएम, कोटीव्हीएम, जेटीबीएस आणि मोबाइल यूटीएस मोबाइल तिकीट असे डिजिटल तिकिटांचे पर्याय प्रवाशांपुढे होते. करोनाकाळात हे पर्याय बंद करण्यात आले. सध्या करोनाची लाट पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. रेल्वे प्रशासनाने नुकतेच ‘करोना विशेष’ हा टॅग हटवत सामान्य रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. यापूर्वीच सर्व लोकल फेऱ्या धावताहेत. असे असताना, केवळ डिजिटल तिकीट सुविधा अद्याप बंद का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यातील एसटी संपाचा परिणाम मुंबई तसेच उपनगरातील रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. अनेकांनी एसटी बंद असल्याने रेल्वेचा पर्याय स्वीकारला. यामुळे लोकल प्रवास करण्यासाठी तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लागत आहेत. त्याचा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे डिजिटल तिकीट उपलब्ध करून सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.

…तर एटीव्हीएम भंगारात जातील

रेल्वे स्थानकात तिकीट खिडक्यांबाहेर उभारलेले एटीव्हीएम तसेच स्मार्ट कार्ड मशीन सध्या वापरात नाहीत. ही मशीन्स सध्या धूळ खात आहेत. विना-वापर राहिल्यास लाखो रुपये खर्च करून घेतलेली ही मशीन्स भंगारात जमा होतील, अशी भीती रेल्वे अधिकारी व्यक्त करतात.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/when-will-you-get-digital-ticket-of-mumbai-local/articleshow/87728295.cms