मुंबई बातम्या

‘अँटीलीया’चा पत्ता विचारणाऱ्या एकाची पटली ओळख; मुंबई पोलिसांकडून मोठा खुलासा – News18 लोकमत

मुंबई, 09 नोव्हेंबर: काल मुंबईत एका टॅक्सीचालकाला दोन संदिग्ध व्यक्तींनी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाचा पत्ता विचारला होता. संबंधित दोन्ही व्यक्तींच्या हालचाली संदिग्ध वाटल्याने टॅक्सीचालकाने याची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. टॅक्सीचालकाच्या या माहितीने मुंबई पोलीस सतर्क झाले होते. तसेच त्यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. तसेच टॅक्सीचालकाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने संशयितांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती.

यानंतर, टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीच्या अधारे मुंबई पोलिसांनी एका संशयित आरोपीची ओळख पटवली आहे. संबंधित व्यक्ती हा गुजरातमधील रहिवासी असून तोही टॅक्सीचालक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित संशयिताला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे. असं असलं तरी त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं संशयास्पद साहित्य आढळून आलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

काल दोन संशयास्पद व्यक्ती मुकेश अंबानीच्या अँटीलीया निवासस्थानाबाहेर फिरताना आढळले होते. त्यानंतर मुकेश अंबानीच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. संबंधित संशयित व्यक्तींच्या हातात एक मोठी बॅग होती. तसेच दोघांनी उर्दू भाषेत संवाद साधल्याची माहिती देखील टॅक्सीचालकाने मुंबई पोलिसांना दिली होती. टॅक्सी चालकाच्या या माहितीनंतर, मुंबई पोलीस प्रशासन खडबडून जाग झालं होतं.
हेही वाचा-पूनम पांडेला पतीकडून बेदम मारहाण, भिंतीवर आपटलं डोकं, सॅम बॉम्बेला अटक
मिळालेल्या तथाकथित माहितीवरून, मुंबई पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवून कसून तपास केला आहे. तसेच डीसीपी दर्जाचे अधिकारी संबंधित सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून पाठपुरावा केला आहे. तपासाअंती पोलिसांनी एका संशयिताची ओळख पटवली आहे. संबंधित संशयितास चौकशीसाठी बोलावण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.

Source: https://lokmat.news18.com/mumbai/one-suspect-identified-who-were-asking-mukesh-ambanis-residence-address-mumbai-police-rm-628557.html