मुंबई बातम्या

तिकीट विक्री होताच मुंबईकर सुस्साट; मुंबई लोकलमध्ये पावणेतीन लाख प्रवासी वाढले – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः लोकल तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर प्रवासाची अट पूर्ण करणाऱ्या महामुंबईतील सुमारे पावणेतीन लाख लसधारकांचा प्रवास सुरू झाला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर २ लाख ७६ हजार ६४ तिकिटांची विक्री झाली आहे. मात्र दिवाळी सुट्टी सुरू झाल्याने लोकल प्रवासी संख्या निम्म्यावर पोहोचली आहे.

मध्य रेल्वेवर एकूण २ लाख १ हजार ३२८ तिकीट-पासची विक्री झाली. यात १ लाख ६९ हजार ७१९ सिंगल आणि रिटर्न तिकिटांचा आणि ३१ हजार ६०९ पासचा समावेश आहे. तिकीट आणि पास विक्रीतून रेल्वेला १ कोटी १५ लाख ३८ हजार ४२३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. पश्चिम रेल्वेवर १ लाख ६ हजार ३४५ तिकीट आणि २३ हजार ९३९ पासची विक्री झाली. तिकीट-पासच्या विक्रीतून पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत १.१३ कोटी रु.ची भर पडली. दिवाळीच्या निमित्ताने अनेकांनी सुट्ट्या घेऊन गावी किंवा पर्यटनस्थळी जाण्याचे बेत आखले आहेत. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दैनंदिन प्रवासीसंख्येत घट नोंदवण्यात आली. दोन्ही मार्गांवर सोमवारी ३९ लाख १८ हजार ९७७ प्रवाशांची नोंद झाली. करोनापूर्व काळात रेल्वे प्रवाशांची संख्या ८० लाख इतकी होती.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-daily-ticket-sales-for-local-trains-cross-3lakhs/articleshow/87520172.cms