मुंबई बातम्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोंडी – Maharashtra Times

म. टा. वृत्तसेवा, वसई

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आणि महामार्गाला जोडणाऱ्या नालासोपारा, वसई, तुंगारेश्वर व सातीवली फाट्यावर संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. या वाहतूककोंडीचा त्रास महामार्गावरील वाहनचालकांना तसेच वसई-विरारमधील वाहनचालकांना होत आहे. यासाठी वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिक करत आहेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा प्रचंड वर्दळीचा महामार्ग आहे. याच महामार्गावर वसई-विरारमधील मोठा औद्योगिक पट्टा आहे. मुंबईतील बहुतांश व्यावसायिक या ठिकाणी व्यवसायानिमित्त येत असतात. शिवाय, मुंबईहून अहमदाबाद व अहमदाबाद येथून मुंबई-वसई-विरार व ठाणे या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात. वसई, नालासोपारा, वसई या शहरांत प्रवेश करायचा तर नालासोपारा, वसई, तुंगारेश्वर, वसई व सातीवली या फाट्यांवर ‘यू टर्न’ आहे. मात्र संध्याकाळच्या सुमारास या महामार्गावरील प्रचंड वर्दळीमुळे या शहरांत प्रवेश करताना लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. तासन्‌तास वाहतूककोंडीत खोळंबून राहावे लागते. या महामार्गालगतच औद्योगिक पट्टा असल्याने वाहतूककोंडीमुळे व्यावसायिकांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे या पॉइंटवर ट्राफिक पोलिस किंवा ट्राफिक मार्शल नेमून, ही वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करून या मार्गावरील प्रवास सुखकर करावा, अशी मागणी शिवसेना युवा नेते पंकज देशमुख यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. वाहतूककोंडीची ही समस्या मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्तांना एका पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली असून यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/thane/traffic-jam-on-mumbai-ahmedabad-highway/articleshow/86751542.cms