मुंबई बातम्या

मुंबई: मध्य रेल्वे रुग्णसेवेतही तत्पर; खऱ्या अर्थाने ठरली ‘लाइफलाइन’ – Loksatta

राज्याची राजधानी मुंबईची लाइफलाइन म्हणून मुंबई लोकल ओळखली जाते. मुंबईच्या वेगाला कारणीभूत असलेल्या या लोकलने प्रवाश्यांच्या सेवेसोबतच आता रुग्णसेवेतही आपली तत्परता दाखवली आहे. रुग्णांसाठी लिव्हर आणि किडनी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात तत्परतेने आणि सुरक्षितरित्या पोहोचवण्याचं काम मुंबई लोकलने केलं आहे.

गुरुवारी मुंबईच्या मध्य रेल्वेमधून ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण स्टेशनपासून दादर रेल्वे स्टेशनपर्यंत सर्वाधिक सुरक्षित पद्धतीने आणि तत्परतेने किडनी आणि लिव्हर पोहोचवण्यात आले. ह्या संपूर्ण प्रवासाला एक तास सात मिनिटांचा अवधी लागला.

एका ब्रेन डेड रुग्णाची किडनी आणि लिव्हर कल्याणच्या एका खासगी रुग्णालयातून परळमधल्या रुग्णालयात पोहोचवण्याचं काम रेल्वेने करुन दाखवलं आहे. या दोन्ही अवयवांच्या या वाहतुकीदरम्यान काही डॉक्टर्स, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, कल्याण आणि दादर रेल्वे स्टेशनचे स्टेशनमास्तर आणि इतर काही कर्मचारी उपस्थित होते.

सुरक्षा दलाच्या जवानांनी स्थानकावरची गर्दी हटवण्यास मदत केली. या सगळ्या कामगिरीची माहिती मध्य रेल्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on September 17, 2021 9:53 am

Web Title: transportation of liver and kidney of a brain death donor mumbai local train vsk 98

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/transportation-of-liver-and-kidney-of-a-brain-death-donor-mumbai-local-train-vsk-98-2598833/