मुंबई बातम्या

मुंबई: वंशाच्या दिव्यासाठी न्यायाधीशाच्या मुलीचा अमानुष छळ; 8 वेळा गर्भपात करून दिल्या नरकयातना – News18 लोकमत

मुंबई, 16 ऑगस्ट: उच्चशिक्षित, श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंब विचारानं किती विकृत असू शकतं याचा प्रत्यय नुकताच मुंबईतील दादर परिसरात आला आहे. मुंबईतील दादरच्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या एका कुटुंबानं वंशाचा दिवा मिळावा यासाठी आपल्या सुनेचा अमानुष छळ केला आहे. विशेष म्हणजे पीडित महिला एका न्यायाधीशाची मुलगी आहे. असं असूनही पीडितेवर सासरच्या मंडळींकडून अमानुष अत्याचार झाले आहेत. आरोपी पतीनं वंशाचा दिवा मिळावा म्हणून पीडितेला परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपात केला आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर मुलगा होत नाही म्हणून आरोपींनी पीडितेला घराबाहेर काढलं आहे.

याप्रकरणी पीडित महिलेनं पतीसह सासरच्या मंडळी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांविरुद्ध गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यासह हुंड्यासाठी छळ आणि अन्य कायद्यांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल केल आहे. आरोपी पती, सासू-सासरे तिघेही वकील असून आरोपी नणंद ही डॉक्टर आहे. अशा उच्चशिक्षित कुटुंबाकडून पीडितेचा अमानुष छळ केल जात होता. पीडित तरुणी प्रभादेवी परिसरात आई वडिलांसोबत वास्तव्याला आहे. पीडितेचे वडिलही माजी न्यायाधीश आहेत.
हेही वाचा-आजोबांकडून घृणास्पद कृत्य, मदतीसाठी काकाकडे गेली त्यानेही केलं शोषण, मग भावानेही
न्यायाधीश पित्यानं 2007 मध्ये आपल्या मुलीचा एका प्रतिष्ठित कुटुंबात आपल्या मुलीचा विवाह केला होता. सोबतच 62 तोळे सोन्याचे दागिनेही दिले होते. पण लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या कुटुंबीयांकडून पीडित महिलेचा छळ सुरू झाला. सासू आणि पतीनं संयुक्त खातं उघडून पीडितेच्या खात्यातील 34 लाख रुपयांची रक्कम आपल्या खात्यात वळवली. 2009 मध्ये फिर्यादी महिलेनं एका मुलीला जन्म दिला. पण आपली करोडो रुपयांची संपत्ती जपण्यासाठी मला वंशाला दिवा पाहिजे म्हणून कित्येकदा मारहाण करण्यात आली.
हेही वाचा-Shocking! मुलाने तरुणीची काढली छेड तर आई-वडिलांनी जिवंत जाळलं
आरोपी पतीनं मुलाच्या हव्यासापोटी पत्नीला प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस (जन्मापूर्वी लिंग तपासणी आणि बीजाची अंमलबजावणी) या टेस्टसाठी बँकॉकला नेलं. याठिकाणी पीडितेचा तब्बल आठवेळा गर्भपात करण्यात आला. गर्भधारणेच्या आधी एम्ब्रियोच्या लिंगाची परीक्षा करून उपचार आणि शस्त्रक्रिया करत होते. यासाठी फिर्यादीला दीड हजाराहून अधिक हार्मोनल आणि स्टिरॉइडचे इंजेक्शन देण्यात आली होती. भारतात बंदी असलेल्या या उपचारासाठी संमतीशिवाय परदेशात नेऊन जवळपास 8 वेळा गर्भपात करण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील पोलीस करत आहेत.

Source: https://lokmat.news18.com/mumbai/well-educated-family-torture-daughter-in-law-for-not-having-baby-boy-in-mumbai-dadar-abortion-performed-8-times-rm-592650.html