मुंबई बातम्या

मुंबई विमानतळावरील प्रवासी ५९ टक्क्यांनी वाढले – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : करोना संकटापूर्वी देशातील सर्वाधिक व्यग्र असलेले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आता संकटकाळातून झपाट्याने सावरू लागले आहे. जुलै महिन्यात विमानतळावरील प्रवासीसंख्येत ५९ टक्क्यांची वाढ होऊन ती ११ लाखांवर पोहोचली.

करोना साथीचा सर्वात मोठा फटका हवाई क्षेत्राला बसला आहे. लॉकडाउनदरम्यान विमानतळ दोन महिनेच बंद राहिले. पण करोनाच्या भीतीमुळे प्रवासीसंख्या जवळपास वर्षभर कमी राहिली. आता मात्र मागील तीन महिन्यांनंतर हवाई क्षेत्रातील प्रवासीसंख्या वाढू लागली आहे. त्यामध्ये मुंबईच्या विमानतळाने मोठी आघाडी घेतली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात मुंबईच्या या विमानतळावरून ११ लाख प्रवाशांनी ये-जा केली. हा आकडा करोना संकट सुरू झाल्यापासून सर्वाधिक आहे. त्याआधी जून महिन्यात या विमानतळावरील प्रवासीसंख्या ६.९४ लाख इतकी होती. त्यापैकी ६.३३ लाख प्रवासी हे देशांतर्गत होते. जूनच्या तुलनेत जुलैतील प्रवासीसंख्येत तब्बल ५९ टक्के वाढ झाली. या ११ लाख प्रवाशांसाठी एकूण ११ हजार ४०० उड्डाणांची हाताळणी विमानतळाने केली. ४ हजारांहून अधिक उड्डाणे शनिवारी-रविवारी झाली. त्याचप्रमाणे जून महिन्यात एकूण ८२६० उड्डाणे झाली. त्यातील २७०० उड्डाणे आठवडाअखेरीची होती. यावरुनच हवाई क्षेत्र हळूहळू सुरळीत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

करोना संकटातून विमानतळ सावरत असताना देशांतर्गत दिल्ली, बंगळुरू व हैदराबाद तर परदेशातील दोहा, नेवार्क आणि दुबई या विमानतळांना सर्वाधिक मागणी आहे. विमानतळावरून जून महिन्यात ७५ ठिकाणी सेवा होत्या. अलीकडेच जुलै ११ शहरांना नव्याने सेवा सुरू करण्यात आली असल्याचे विमानतळ सूत्रांनी सांगितले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-airport-witnesses-59-hike-in-passenger-traffic-in-july-month/articleshow/85261691.cms