मुंबई बातम्या

संतापाचा भडका! लोकल ट्रेन सुरू करण्याच्या मागणीसाठी मुंबई, ठाण्यात आंदोलन – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची जोरदार मागणी
  • भाजप कार्यकर्त्याचं मुंबई, ठाण्यात आंदोलन
  • रेल्वे स्थानकांमध्ये घोषणाबाजी, काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई/ठाणे: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक निर्बंध शिथील झाले आहेत. मात्र, मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन अद्यापही बंद आहे. त्यामुळं मुंबई व आसपासच्या शहरातील नोकरदारांची पुरती कोंडी झाली आहे. राज्य सरकार लोकलचा निर्णय सातत्यानं पुढं ढकलत असल्यानं सर्वसामान्यांमध्ये संताप असून भारतीय जनता पक्षानं रस्त्यावर येऊन आज या संतापाला वाट मोकळी करून दिली.

मुंबई व ठाण्यात भाजपचे नेते, आमदार व कार्यकते रस्त्यावर उतरले. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली चर्चगेट रेल्वे स्थानकात तर, आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात आलं. दोन डोस घेतलेल्या लोकांना प्रवास करू द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. लसीकरण केल्यानंतर विमान, एसटी, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी यातून प्रवासास परवानगी आहे, मग लोकलमध्ये का नाही, असा प्रश्न उपस्थित करत लोकलमुभा मिळेपर्यंत सविनय कायदेभंग सुरूच ठेवणार, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.
ठाणे रेल्वे स्थानकावरही घोषणाबाजी

लोकल ट्रेन सुरू होणे हा ठाणे जिल्ह्यातील नोकरदारांच्या दृष्टीनंही जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्याची दखल घेत ठाणे रेल्वे स्थानकातही भाजपनं आंदोलन केलं. ठाणे भाजप अध्यक्ष व आमदार अॅड. निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रेल्वे स्थानकात जमले. रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, लोकल सुरू करा, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकाचा परिसर दणाणून सोडला.
मुंबईत करोनाचे निर्बंध बऱ्याच अंशी शिथील झाले असले तरी लोकल बंद असल्यामुळं अर्थचक्र अद्याप रुळावर आलेले नाही. खासगी कार्यालयं १०० टक्के क्षमतेनं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी कर्मचारी वर्ग कार्यालयात पोहोचणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं किमान लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी मिळावी अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील एका कार्यक्रमात लोकलच्या मुद्द्यावर भाष्य केलं खरं, पण कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही. त्यामुळं मुंबईकरांमध्ये नाराजी आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-workers-protest-in-mumbai-thane-demands-to-resume-local-train-for-all/articleshow/85092224.cms