मुंबई बातम्या

मुंबई: गोवंडी इमारत दुर्घटनेत चौथा मृत्यू; 7 जणांवर उपचार सुरू – Sakal

शिवाजीनगर भागात घडली दुर्घटना; मुंबईला पावसाचा तडाखा सुरूच

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांना अनेर प्रकारचे त्रास भोगावे लागत आहेत. नुकतीच मुंबईतील गोवंडी भागात एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात ही दुर्घटना घडली. जखमींना महापालिकेच्या राजावाडी आणि सायन रुग्णालयात नेण्यात आले. 7 जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Govandi Building Collapse Incidence 3 killed 7 injured in Mumbai due to heavy rainfall vjb 91)

हेही वाचा: “अहो संजय राऊत, निर्लज्जपणालाही मर्यादा असतात…”; भाजपची टीका

दुर्घटनेत चौथा मृत्यू

मुंबईत गोवंडी शिवाजी नगर प्लॉट नंबर 3, बॉम्बे हॉस्पिटल येथील तळ अधिक एक मजल्याची एक इमारत आज पहाटे 5 च्या सुमारास कोसळली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 10 जणांना बाहेर काढून 7 जणांना राजावाडी तर 3 जणांना सायन रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी सुरूवातीला नेहा शेख (35 वर्ष), मोकर शेख (85 वर्ष), शमशाद शेख (45 वर्ष) या तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राजावाडी रुग्णालयातून देण्यात आली होती. त्यानंतर एका २२ वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला. फरीन शेख असं या तरूणीचं नाव असून तिच्यावर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. डॉ. मनिषा चोपटे यांनी याबद्दलची माहिती दिली.

हेही वाचा: ‘राज ठाकरेच काहीतरी करु शकतात’, महाडच्या महापुरातून जीव वाचवण्यासाठी अक्षयचं Fb Live

7 जणांवर उपचार सुरू

राजावाडी रुग्णालयात दाखल असलेल्या परवेझ शेख (50 वर्ष), अमिना शेख (60 वर्ष), अमोल धेडाई (38 वर्ष), स्यामूल सिंग (25 वर्ष) यांची प्रकृती स्थिर आहे. तर मोहम्मद फैज कुरेशी (21 वर्ष), नमरा कुरेशी (17 वर्ष), शाहिना कुरेशी (26 वर्ष) यांच्यावर सायन रुग्णालयात अपघात विभागात उपचार करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/govandi-building-collapse-incidence-3-killed-7-injured-in-mumbai-due-to-heavy-rainfall-vjb-91