मुंबई बातम्या

Mumbai Unlock Guidelines: मुंबई आता लेव्हल १ मध्ये असली तरी…; निर्बंधांबाबत पालिकेने जारी केला आदेश – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबई महापालिकेकडून निर्बंधांबाबत आदेश जारी.
  • लेव्हल १ ऐवजी लेव्हल ३ चे निर्बंधच राहणार कायम.
  • २७ जूनपर्यंत मुंबई पालिका क्षेत्रात लागू राहणार आदेश.

मुंबई: ब्रेक द चेन अंतर्गत मुंबई महापालिका प्रशासनाकडून नव्याने आदेश जारी करण्यात आले असून मुंबई महापालिका क्षेत्रात २७ जूनपर्यंत लेव्हल ३ नुसार निर्बंध कायम राहणार आहेत. ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता आणि कोविड पॉझिटिव्हिटी रेटनुसार मुंबई सध्या लेव्हल १ मध्ये असली तरी लोकसंख्या, लोकलमध्ये होणारी गर्दी आणि तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन निर्बंधांमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ( Mumbai unlock guidelines update

वाचा: लोकलसाठी अजून किती दिवस प्रतीक्षा? आता मंत्र्यांनीच केलं स्पष्ट

राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या कोविड पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर या आधारावर लेव्हल निश्चित करण्यात येत आहेत. दर आठवड्याला याबाबतच्या स्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार जिल्हा किंवा महापालिका क्षेत्रासाठी लेव्हल निश्चित करून निर्बंध कडक किंवा शिथील करण्यात येत आहेत. मुंबईत सध्या कोविड पॉझिटिव्हिटी रेट ३.७९ टक्के इतका आहे तर ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर २३.५६ टक्के इतका आहे. हे प्रमाण पाहता मुंबई सध्या लेव्हल ३ मधून लेवल १ मध्ये दाखल झाली आहे. मात्र मुंबईची एकंदर स्थिती व संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेने निर्बंधांबाबत आस्ते कदम पुढे जाण्याचे धोरण कायम ठेवले आहे.

वाचा: नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव असावे?; राज ठाकरे म्हणाले…

मुंबई शहराची भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण, मुंबई महानगर प्रदेशातून लोकल ट्रेनने दाटीवाटीने प्रवास करून मोठ्या संख्येने मुंबई शहरात येणारे प्रवासी आणि टास्क फोर्स व कोविड १९ बाबत तज्ज्ञांनी वर्तवलेली तिसऱ्या लाटेची शक्यता या बाबी लक्षात घेत मुंबईत लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवण्यात येत आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सध्या लागू असलेले निर्बंध २१ ते २७ जूनपर्यंत जसेच्या तसे लागू राहतील. याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांची सहमती घेण्यात आलेली आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

सर्वांसाठी लोकल तूर्त नाहीच

मुंबईत लेव्हल ३ चे निर्बंध कायम राहणार असल्याने लोकल सेवा तूर्त सामान्यांसाठी बंदच राहणार आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा असून इतर प्रवाशांना लोकलची दारे बंद करण्यात आलेली आहेत. मुंबईतील कोविड स्थिती सुधारल्याने लोकल सर्वांसाठी खुली होण्याची आशा होती मात्र आता २७ जूनपर्यंत तरी लोकलवरील निर्बंध कायम राहणार आहेत, हे महापालिकेच्या ताज्या आदेशाने स्पष्ट झाले आहे.

वाचा: करोना लशीचे दोन भिन्न डोस प्रभावी?; WHO ने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-to-remain-under-level-3-of-lockdown-bmc-issues-official-orders/articleshow/83713703.cms