मुंबई बातम्या

Maharashtra Unlock: मुंबई दुसऱ्या टप्प्यात होणार अनलॉक; लोकलबाबत वडेट्टीवार म्हणाले… – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • महाराष्ट्रात उद्यापासून पाच टप्प्यांत अनलॉक होणार.
  • मुंबई शहर आणि उपनगरात तूर्त काही निर्बंध कायम.
  • पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यानंतरच लोकल सर्वांसाठी.

मुंबई: राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागल्याने सरकारने खूप मोठे पाऊल उचलत अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी पाच टप्पे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के वा त्यापेक्षा कमी असलेल्या १८ जिल्ह्यांत लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईचा समावेश दुसऱ्या टप्प्यात असून मुंबई अनलॉक झाल्यानंतरच लोकल सेवा सर्वांसाठी खुली करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ( Mumbai Local Train Latest Update )

वाचा:सुखद धक्का! उद्यापासून १८ जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे उठणार

लॉकडाऊनच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्रासाठी सुखद धक्का देणारी बातमी राज्य सरकारने दिली आहे. राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असताना अनलॉकबाबतचे पत्ते खुले करत आज राज्य सरकारने मोठा धमाका केला आहे. राज्यात पाच टप्प्यांत लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल १८ जिल्ह्यांमध्ये उद्यापासूनच अनलॉक केले जाणार आहे. या सर्व जिल्ह्यांत पाच किंवा त्यापेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असून त्याआधारावरच सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अहमदनगर, अमरावती, हिंगोली आणि नंदूरबार या सहा जिल्ह्यांत लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या १० जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या टप्प्यात पुणे, रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

वाचा:धोक्याची घंटा; निर्बंध शिथील होताच ‘या’ जिल्ह्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ

याबाबत माहिती देताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. करोना स्थितीचा दर शुक्रवारी आढावा घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईचा समावेश दुसऱ्या टप्प्यात असल्याने तूर्त काही निर्बंध येथे राहणार आहे. ते पाहता लोकल सर्वांसाठी खुली करण्याबाबत लगेचच कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. तूर्त लोकल प्रवासावरील निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. आठवडाभरात मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट आणखी कमी झाला तर लोकल सर्वांसाठी खुला करण्याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. ठाणे जिल्हा पहिल्या टप्प्यात येत असला व तिथे उद्यापासून निर्बंध हटवले जाणार असले तरी लोकलबाबत तिथेही निर्बंध कायम राहणार आहेत.

वाचा: राज्यात करोनामुक्त गाव योजना जाहीर; ‘त्या’ गावाला मिळणार ५० लाखांचं बक्षीस

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-unveils-5-level-unlock-plan-mumbai-local-trains-wont-run-for-now/articleshow/83204458.cms