मुंबई बातम्या

tauktae cyclone : मुंबई हायजवळ ONGC कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची जागा बुडाली; अजूनही ९६ जण बेपत्ता – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • ONGC कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची जागा बुडाली
  • युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
  • अजूनही ९६ कर्मचारी बेपत्ता

मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादाळाने समुद्रात तयार झालेल्या स्थितीने गंभीर संकट निर्माण झालं. मुंबई हायजवळ हीरा इंधन विहीर परिसरात ओएनजीसीचे २७३ कर्मचारी निवासी कर्तव्यावर होते. नौदलाच्या तीन युद्धनौका, तटरक्षक दलाच्या नौका व अन्य जहाजांनी मिळून खवळलेल्या समुद्रात सकाळपर्यंत १४६ कर्मचाऱ्यांना वाचवले. त्यांनतर त्यांच्या निवासाची जागा समुद्रात बुडाली. ही जागा पाण्याखाली गेल्यानंतर आणखी ३१ जणांना बाहेर काढण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे, मात्र अद्याप ९६ कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.

मुंबई हायजवळ बचाव केलेल्या कर्मचाऱ्यांना नौदलाच्या कुलाब्यातील आयएनएचएस अश्विनी रुग्णालयात आणण्यात आले आहे. उर्वरित कर्मचारी लाईफ जॅकेटसह समुद्रात इतरत्र विखुरले गेले आहेत. नौदल हेलिकॉप्टर देखील मुंबईहून रवाना झाले आहे. गोव्याहून टेहळणी विमानाला पाचारण करण्यात आले आहे.

तटरक्षक दल देखील मुंबई हायजवळ हेलिकॉप्टरने सेवा देत आहे. नौदल व तटरक्षक दल यांचे हेलिकॉप्टर मुंबईहून रवाना झाले आहे,

दुसरीकडे, ४८ सागरी मैलावर अडकलेल्या १३७ खलाशांनाही तटरक्षक दलाने सुखरुप किनाऱ्यावर आणले आहे.

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी जेटीवॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीची तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या साफसफाई मोहिमेची पाहणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. याप्रसंगी ‘ए’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती चंदा जाधव तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/tauktae-cyclone-ongc-staff-quarters-near-mumbai-high-97-still-missing/articleshow/82737566.cms