मुंबई बातम्या

तौक्ते : चक्रीवादळामुळे ‘बॉम्बे हाय’ जवळ अडकलेल्या 400 जणांपैकी 132 जणांची सुटका – BBC News मराठी

फोटो स्रोत, Getty Images

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी नौदलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सोमवारी (17 मे) मुंबईच्या समुद्रात 400 जण अडकले होते. बॅाम्बे हाय तेलक्षेत्राजवळ बार्जवर 273 जण, तर आणखी एका बार्जवर 137 जण अडकले होते.

त्याशिवाय सागर भूषण तेल विहीरीजवळ आणि त्याचे बार्ज SS-3 शेकडो लोक अडकले आहेत.

रात्रभर INS कोची आणि INS कोलकाता या नौदलाच्या बोटींद्वारे अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. नौदलाच्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एनर्जी स्टार आणि ग्रेट शिप अहल्या या दोन बोटीही सहभागी झाल्या.

दिवस उजाडताच हवाई शोध मोहीमही सुरू करण्यात आली आहे.

बार्ज P503 वर 273 जण असल्याची माहिती मिळाली होती. 146 जणांना वाचवलं, बाकीच्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू. बार्ज बुडाला आहे. (111 जणांना आयएनएस कोची युद्धनौकेनं वाचवलं, ग्रेटशिप अहिल्यानं 17 जणांना आणि ओशन एनर्जी या बोटीनं आणखी 18 जणांना वाचवलं आहे.) नौदलाच्या आयएनएस कोचीसह हेलिकॉप्टर्स बचावकार्यात आहेत, पण हवा अजूनही खराब आहे.

वादळ

फोटो स्रोत, Defence PRO

‘Gal Constructor’ हा बार्ज कुलाबाजवळ 48 नॉटिकल मैलांवर म्हणजे जवळपास ८८ किलोमीटवर आहे. त्यावर 137 जण होते. वॉटर लिली नावाचं टोईंग जहाज तिथे पोहोचलं आहे. कोस्ट गार्डचं सम्राट हे जहाज आणखी काही लाईफ बोट्स कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कितीजणांना वाचवलं, याची माहिती अजून मिळालेली नाही. सागर भूषण या तेलविहीरीजवळ 101 जण अडकले आहेत. तसंच SS-3 या बार्जवर 196 जण अडकले आहेत. गुजरातच्या पिपावाह बंदरापासून 50 नॉटिकल मैल म्हणजे जवळपास 92 किलोमीटरवर ही जागा आहे. INS तलवार तिथे बचावकार्यासाठी गेली आहे.

बॉम्बे हाय हे तेलक्षेत्र मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून 176 किलोमीटर आत समुद्रात आहे.

गुजरातच्या किनाऱ्याला धडकल्यानंतर वादळाचा वेग मंदावला

तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीला सोमवारी रात्री धडकलं. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 185 किलोमीटर्सपेक्षाही जास्त होता.

तौक्ते

फोटो स्रोत, Pratik Chorge/Hindustan Times via Getty Images

पुढच्या तीन तासांमध्ये या वादळाचं केंद्र सौराष्ट्रच्या किनारपट्टीवरून सरकून ते दीवपासून पुढे जाणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय.

पण काहीशा दिलाश्याची बाब म्हणजे गुजरातच्या किनारपट्टीला धडकल्यानंतर या वादळाची तीव्रता काहीशी मंदावली आहे. पण अजूनही हे वादळ अति गंभीर श्रेणीत मोडतं.

या चक्रीवादळामुळे गुजरात अजूनपर्यंत मृत्यू वा जखमी होण्याचं वृत्त नसल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. पण वादळामुळे विजेच्या तारा कोसळणं, इमारतींचं नुकसान होणं आणि झाडं पडल्याचं वृत्त आहे.

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत गुजरात सरकारने दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हटवलंय. तर चक्रीवादळाचा फटका बसत असलेल्या गुजरातमधल्या भागांमधलं कोव्हिड लसीकरण केंद्र सरकारच्या सूचनेनुसार थांबवण्यात आलंय.

मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF आणि SDRF ची पथकं तैनात करण्यात आली असून सैन्याच्या तुकड्याही मदतीसाठी सज्ज आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

‘सोपी गोष्ट’ आणि ‘3 गोष्टी’ हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

Source: https://www.bbc.com/marathi/india-57153235