मुंबई बातम्या

“मुंबईत पुढचे ३ दिवस लसीकरण बंद राहणार”, अतिरिक्त आयुक्तांची माहिती! – Loksatta

राज्यात मोठ्या प्रमाणावर सध्या लसीकरण सुरू असताना अनेक ठिकाणी लसींचा पुरवठा अपुरा पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत लसीच्या डोसचा अपुरा साठा असल्यामुळे पुढचे किमान ३ दिवस लसीकरण बंद राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. तसेच, रविवारपर्यंत नवीन पुरवठ्याबाबत निश्चित माहिती मिळेल. त्यानुसार प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मुंबईकरांना त्याची माहिती दिली जाईल आणि सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू केलं जाईल, असं देखील सुरेश काकाणी यावेळी बोलताना म्हणाले. त्यामुळे आता पुढचे तीन दिवस मुंबईकरांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.



पुढील साठा मिळेपर्यंत…!

“आजचा आमचा साठा संपत आलेला आहे. पुढचे ३ दिवस लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन आहे की लसीकरण केंद्रांवर त्यांनी गर्दी करू नये. मुंबईतल्या सर्वच केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईसाठी ७६ हजार डोस मिळाले आहेत. त्यापैकी ५० हजार आज दुपारपर्यंत संपले आहेत. उरलेले दिवसभरात संपतील. त्यामुळे पुढील साठा मिळेपर्यंत लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. उद्या साठा मिळण्याची शक्यता कमी आहे. केंद्राकडून विशेष बाब म्हणून साठा उपलब्ध करून दिला, तरच लसीकरण करता येईल”, असं सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे.

देश एकच, लस एकच मग दर वेगवेगळे का?; उच्च न्यायालयाची केंद्रासहीत सीरम, भारत बायोटेकला नोटीस

आधी नोंदणी, मगच लस!

दरम्यान, यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी लसीकरणाविषयी नागरिकांना आवाहन केलं आहे. “नागरिकांनी आधी कोविन अॅपवर नोंदणी करावी किंवा संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि मगच दिलेल्या तारखेला केंद्रावर जाऊन लस घ्यावी. यामध्ये ज्यांनी नोंदणी केली आहे आणि ज्यांचा दुसरा डोस आहे, अशाच नागरिकांना लसीकरणामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लीकरण केंद्रांवर गर्दी करू नये”, असं ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 29, 2021 4:27 pm

Web Title: vaccination in mumbai on hold duw to vaccine shortage bmc announce pmw 88

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/vaccination-in-mumbai-on-hold-duw-to-vaccine-shortage-bmc-announce-pmw-88-2457220/