मुंबई बातम्या

जुमा मशिदीत सामूहिक नमाज पठणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय – Sakal

मुंबई: दक्षिण मुंबईतील जुमा मशीद ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठणाला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. पण सध्याच्या कोविड संसर्गामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने जुमा मशीद ट्रस्टची याचिका फेटाळून लावली आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. त्यामुळे दिवसातून पाचवेळा नमाज पठणाला परवानगी द्यावी,  अशी त्यांची मागणी होती. 

जुमा मॉस्क ट्रस्टच्या एक एकर जागेत ७ हजार माणसं नमाज पठणाला बसू शकतात, असा त्यांचा दावा होता. पण सध्या कोविडमुळे एकूण क्षमतेच्या ५० टक्के परवानगी द्या, अशी त्यांची मागणी होती. सुट्टीकालीन न्या रमेश धनुका आणि न्या व्ही जी बिश्त यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. “सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. प्रत्येक धर्माला आपले विधी करण्याचा अधिकार आहे. ते विधी महत्त्वाचे आहेत. पण सध्या जनहित, सरकारी आदेश आणि नागरिकाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे” असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. 

मुंबईत खटला लढवणाऱ्या वकिलानेच अशीलाच केलं अपहरण, जाणून घ्या कारण…

“सध्या मुंबई महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. धोकादायक इशारा देत आहे. त्यामुळे एखाद्या धर्माला अपवादात्मक १५ दिवसांसाठी मागणी मंजूर करता येणार नाही. या क्षणी सरकार कुठलाही धोका पत्करु इच्छित नाही” असे  सरकारी वकिल ज्योति चव्हाण म्हणाल्या.  सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता, याचिकाकर्त्यांना अशा प्रकारे नमाज पठणाची परवानगी देता येणार नाही, असे सांगत  खंडपीठाने याचिका फेटाळली. 

(संपादन – दीनानाथ परब)
 

Source: https://www.esakal.com/mumbai/bombay-hc-denies-permission-juma-mosque-holding-prayers-during-ramadan-430110