मुंबई बातम्या

कला परंपरेला नवा आयाम, यंदा बॉम्बे आर्ट सोसायटीचे ऑनलाइन प्रदर्शन; 500 कलाकृती बघण्याची पर्वणी – Saamana

द बॉम्बे आर्ट सोसायटीचे वार्षिक कला प्रदर्शन म्हणजे कलाकारांचा अभिमान आणि रसिकांसाठी पर्वणीच जणू. यंदा कोरोनामुळे प्रदर्शन प्रत्यक्षात रसिकांना अनुभवता आलेले नाही. मात्र या परंपरेत खंड न पाडता यंदा प्रथमच ऑनलाइन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 500 कलाकृतींचा आनंद रसिकांना मिळत आहे. कला परंपरेच्या नव्या आयामाचे रसिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले असून येत्या 25 एप्रिलपर्यंत प्रदर्शन www.bombayartsociety.org या वेबसाईटवर बघता येईल.

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वांद्रे येथील दालनात 25 मार्च रोजी 129 व्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी पेंटिंग, ग्राफिक, पह्टोग्राफी, शिल्पकृती अशा एकूण 500 कलाकृतींमधून निवडक 50 कलाकारांना आणि त्यांच्या कलाकृतींना यावेळी पुरस्कार देण्यात आले. यंदाचा राज्यपालांतर्फे देण्यात येणारा ‘राज्यपाल पुरस्कार’ हा कलाकार चंदन भंडारी यांना मिळाला. सुवर्णपदक देऊन भंडारी यांचा सन्मान करण्यात आला. आर्ट सोसायटीद्वारे देण्यात येणारे रौप्यपदक चित्रनजन मोहराणा आणि कास्यपदक राबी गुप्ता यांना देण्यात आले. सर्वोत्तम पेंटिंगसाठी देण्यात येणारा ललित कला अकादमीचा पुरस्कार बापू बाविस्कर यांना प्रदान करण्यात आला.

image

रसिकांचा भरभरून प्रतिसाद

ऑनलाइन पद्धतीमुळे यंदा देशातील तसेच विदेशात राहणाऱया हिंदुस्थानी कलाकारांनी प्रदर्शनात सहभाग घेतला. पेंटिंग, शिल्पकृती, ग्राफिक, पह्टोग्राफी अशा विविध श्रेणी अंतर्गत 1,500 हून अधिक कलाकारांच्या 3,600 हून अधिक प्रवेशिका आल्या. परीक्षकांनी निवडलेल्या 500 कलाकृती ऑनलाइन प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत, असे बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

image







Source: https://www.saamana.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6/