मुंबई बातम्या

मराठी भाषेत शालेय शिक्षण घेणाऱ्यांना मुंबई मनपाने नाकारली नोकरी – Times Now Marathi

मराठी भाषेत शालेय शिक्षण घेणाऱ्यांना मुंबई मनपाने नाकारली नोकरी& 

थोडं पण कामाचं

  • मराठी भाषेत शालेय शिक्षण घेणाऱ्यांना मुंबई मनपाने नाकारली नोकरी
  • शिक्षक भरती प्रक्रियेत निवड केल्यानंतर नाकारली नोकरी
  • नोकरी नाकारलेल्या शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबईः मुंबई मनपाच्या शाळांसाठी झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत २५२ शिक्षकांची निवड झाली. यापैकी १०२ शिक्षकांना नोकरीवर ठेवण्यास मुंबई मनपाने अचानक नकार दिला. शालेय शिक्षण मराठी भाषेत झाले आहे, असे कारण देत या शिक्षकांना नोकऱ्या नाकारण्यात आल्या. मुंबई मनपाच्या या कारभाराचा निषेध म्हणून १०२ शिक्षक फेब्रुवारी महिन्यात आझाद मैदानावर आले. त्यांनी मैदानात आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला चार आठवडे होत आले तरी मुंबई मनपाने हा प्रश्न सोडवलेला नाही. (teachers protest at azad maidan mumbai)

मुंबई मनपाच्या २००८च्या ठरावानुसार ‘मुंबई पब्लिक स्कूल’ श्रेणीतील पालिकेच्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे. ज्या शिक्षकांनी पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतले आहे त्यांचा विचार ‘मुंबई पब्लिक स्कूल’ श्रेणीतील पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक पदाच्या नोकरीसाठी होऊ शकतो. याच ठरावाला पुढे करत मनपाने १०२ शिक्षकांना नोकऱ्या नाकारल्या आहेत.

आधी नोकरीसाठी निवड करायची आणि नंतर ठरावाचे कारण पुढे करुन नोकरी नाकारायची या अजब कारभारामुळे शिक्षकांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे. मुंबई मनपाने सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करताना मराठी भाषेला प्राधान्य दिले आहे. मग शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र ठरलेल्यांना शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून हवे, ही अट घालण्याची गरज काय; असा प्रश्न आंदोलन करत असलेल्या शिक्षकांनी उपस्थित केला आहे. 

संपूर्ण भारतात शालेय शिक्षणाबाबतचे निर्णय घेताना पालकांच्या इच्छा आणि त्यांची आर्थिक स्थिती यांना प्राधान्य असते. विद्यार्थ्यांना पर्याय निवडण्याची पहिली संधी महाविद्यालयाच्या पातळीवर मिळू शकते. याच कारणामुळे शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र ठरलेल्यांना शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून हवे ही अट घालणे व्यावहारिक असू शकत नाही. शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र ठरलेल्या आणि जे विषय शिकवायचे आहेत ते शिकवण्यासाठी सक्षम असलेल्या व्यक्तीला शिक्षकाची नोकरी नाकारणे हे अन्यायकारक असल्याची भूमिका आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी मांडली. 

मराठी भाषेत शिक्षण घेतलेल्या अनेकांनी उच्च पदांवर प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या प्रगतीत मराठी भाषेतील शिक्षण हा अडथळा ठरला नाही. मग आमच्या मराठीतल्या शालेय शिक्षणाचा मनपाला काय त्रास होत आहे, असा प्रश्न आंदोलक शिक्षकांनी उपस्थित केला आहे. मराठी वाचवा असे म्हणायचे आणि मराठी भाषेची गळचेपी करायचे असे मुंबई मनपाचे अनाकलनीय धोरण आहे, अशी टीका आंदोलन करणाऱ्या १०२ शिक्षकांनी केली. 

बातमीची भावकी

मुंबई मनपाच्या शाळांसाठी झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत निवड होऊनही शालेय शिक्षण मराठी भाषेत झाले म्हणून नोकरी नाकारल्या गेलेल्या १०२ शिक्षकांनी आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमित, मराठी अभ्यास केंद्र, मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि आम्ही शिक्षक संघटना यांनी १०२ शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी महाराष्ट्र शासन आणि मुंबई मनपाला केली आहे. मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमित, मराठी अभ्यास केंद्र, मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) आणि आम्ही शिक्षक संघटना यांनी आंदोलन करत असलेल्या शिक्षकांना पाठिंबा जाहीर केला आहे. मराठी भाषा दिनी तरी हा प्रश्न सोडवला जावा, अशी अपेक्षा आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/teachers-protest-at-azad-maidan-mumbai/337224