मुंबई बातम्या

मुंबईवर लॉकडाऊनचं संकट? आतापर्यंत 94 इमारती सील – TV9 Marathi

मुंबईवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट दाटून आलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढू लागला आहे (Mumbai Lockdown Update).

लॉकडाऊन

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट दाटून आलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 94 इमारती सील केल्या आहेत, अशी माहिती स्वत: महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी आता शिस्त पाळली नाही तर कठीण परिस्थिती उद्भवेल, असा इशारा महापौरांनी दिला आहे (Mumbai Lockdown Update).

“मुंबईकरांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळावं. मास्क न वापरणाऱ्यांवर 2, 5 आणि 10 हजारांचा दंड ठोठावला तर त्यांना शिस्त लागेल. शिस्त न पाळणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी क्लिन मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. या क्लिन मार्शला विरोध करणे चुकीचे आहे. क्लिन मार्शल यांना कारवाई करण्यासाठी पोलिसांनी देखील सहकार्य करावे”, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील मुंबईकरांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे (Mumbai Lockdown Update).

महापालिकेचं मिशन झिरो, पण एका दिवसात 823 रुग्ण

मुंबईत कोरोना प्रचंड वेगाने फोफावत चाललाय. विशेष म्हणजे काल (19 फेब्रुवारी) दिवसभरात तब्बल 823 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. मात्र, या परिस्थितीतही न डगमगता प्रशासन सतर्क झालं आहे. महापालिका प्रशासनाने मिशन झिरो मोहिम सुरु केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

मुंबईतील गेल्या दहा दिवसातील रुग्णसंख्या:

19 फेब्रुवारी – 823 नवे रुग्ण
18 फेब्रुवारी – 736 नवे रुग्ण
17 फेब्रुवारी – 721 नवे रुग्ण
16 फेब्रुवारी – 461 नवे रुग्ण
15 फेब्रुवारी – 493 नवे रुग्ण
14 फेब्रुवारी – 645 नवे रुग्ण
13 फेब्रुवारी – 529 नवे रुग्ण
12 फेब्रुवारी – 599 नवे रुग्ण
11 फेब्रुवारी – 510 नवे रुग्ण
10 फेब्रुवारी – 558 नवे रुग्ण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या गाईडलाईन्स :

  1.  कुठल्याही निवासी इमारतीत कोरोनाचे पाच पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्यात येईल.
  2. विलगीकरणाचे नियम, तसेच लग्न आणि सार्वजनिक कार्यक्रमात नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.
  3. ब्राझील येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांकरिता संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात येईल.
  4. घरी विलगीकरणात राहणाऱ्या व्यक्तींच्या हातावर शिक्का लावण्यात येईल.
  5. मास्क न लावता प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याकरिता 300 मार्शलची नेमणूक करण्यात येणार आहे.
  6. मास्कचा योग्यरित्या वापर न करणाऱ्या आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याकरिता मार्शल्सची संख्या दुपचीने वाढवून 48 हजार एवढी करण्यात येणार आहे.
  7. विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आणि दंड आकारण्याचेल अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत.
  8. लग्न सोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी केली जाईल. कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले असल्यास दंडात्मक कारवाई करुन आयोजक आणि संबंधित व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल केले जातील.

हॉटेल, पब, रेस्टॉरंट, मंगलकार्यालयांना नोटीसा :

मुंबई महापालिकेने जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्सनुसार कारवाईदेखील करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेने अंधेरी पश्चिमेतील 32 हॉटेल, पब, रेस्टॉरंट आणि मंगलकार्यालयाना नोटीसा बजावल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळणं सर्वांसाठी बंधनकारक असून या नियमांचं काटेकोरपणे पालनं करा. तसेच होणारी गर्दी टाळा, अशा सूचनाच पालिकेने या हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि मंगलकार्यालयांना नोटीशी दिल्या आहेत.

महापालिकेने या रेस्टॉरंट, हॉटेल, पब आणि मंगलकार्यालयांना सज्जड दम दिला आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच आस्थापन सील करण्यात येईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

धारावीमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवले

एकीकडे मुंबईतील 4 वॉर्ड कोव्हिड हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करत असताना मुंबईत सुरुवातीला कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी (Dharavi0, माहीम (Mahim) येथेही प्रशासनानं नियमांच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. नियंत्रणात आलेल्या धारावीत कोरोनानं पुन्हा हातपाय पसरु नये, या करिता प्रशासन दक्ष झालं आहे. दादर, धारावी, माहीम क्षेत्रातील व्यापारी आस्थापनांमधील मालक, चालक, तसेच इतर कर्मचारी वर्गाची तपासणी करण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानकावर गुजरात तसेच इतर राज्यांमधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग आणि कोव्हिडसदृश लक्षणं असणाऱ्या प्रवाशांची मोफत चाचणी करुन कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यांना विलगीकरणासाठी विलगीकरण कक्षात पाठविण्यात येते. माहीममध्ये रुग्ण संख्या वाढल्या पालिकेने टेस्टिंग वाढवल्या आहेत

संबंधित बातम्या :

मुंबईत हॉटेल, पब, रेस्टॉरंट, मंगलकार्यालयांना नोटीसा; महापालिका कामाला लागली

शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा स्थगित

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-corona-cases-increases-lockdown-will-be-announced-403812.html