मुंबई बातम्या

गुन्हेगारी संपवण्यासाठी मुंबई पोलिसांची अफलातून योजना; आरोपीला दत्तक घेणार – Maharashtra Times

मुंबई : मुंबईतील गुन्हेगारीवर नियंत्रण राहावे, यासाठी पोलिसांनी एखाद्या लहान मुलाप्रमाणे गुन्हेगार, आरोपींवर कायम नजर ठेवण्याचे ठरविले आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी ‘आरोपी दत्तक योजना’ आणली असून प्रत्येक पोलिसाला एका आरोपी दत्तक म्हणून दिला जाणार आहे. गेल्या दोन महिन्यांत १४ हजार ८५८ गुन्हेगार पोलिसांचे ‘दत्तक’ झाले आहेत. दत्तक गुन्हेगाराचे उपजीविकेचे साधन कोणते? त्याची जीवनशैली, दिनक्रम, कुटुंबातील सदस्य या तसेच इतर सर्व लहानसहान बाबींवर त्याला दत्तक घेणाऱ्या पोलिसाचे लक्ष राहणार आहे.

एकीकडे सायबर गुन्हा सायबर गुन्ह्यांचे वाढते आव्हान असताना दुसरीकडे रस्त्यावरील गुन्हेगारीही रोखणे फार महत्त्वाचे आहे. चोरी, दरोडा, घरफोडी, मारामारी, सोनसाखळी चोरी यांसारखे गुन्हे आटोक्यात आणण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. यासाठी पोलिस आयुक्त निरनिराळ्या प्रतिबंधात्मक क्लृप्त्या अंमलात आणत आहे. पूर्वउपनगरातील गुन्हेगारी टोळ्यांचा उपद्रव हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी ‘मोक्का’चे हत्यार उपसले आहे. गुन्हे वाढू नयेत यासाठी गुन्हेगारांकडून ‘चांगल्या वागणुकीचे हमीपत्र’ भरून घेतले जात आहे. २५ हजारांपासून तब्बल ५० लाखांपर्यंतचीही हमीपत्रे असल्याने गुन्हेगारांची वर्तवणूक चांगली राहील, अशी पोलिसांना आशा आहे.

नोव्हेंबरपासून ‘आरोपी दत्तक योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत १४ हजार ८५८ आरोपींना आतापर्यंत सहभागी करून घेण्यात आले आहे. आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर मुंबईत नेमणुकीला असताना त्यांनी ही योजना राबवली होती. मात्र त्यावेळी ती विशिष्ट भागापुरती मर्यादित होती. संपूर्ण मुंबईत ही योजना अंमलात आणण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गुन्हे रोखण्यासाठी जे काही शक्य आहे तेवढे करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या योजनेमुळे आरोपीवर पोलिसाचे लक्ष तर राहीलच, पण त्याचबरोबर पोलिस कायम संपर्कात असल्याने गुन्हेगारी क्षेत्र अयोग्य असल्याची जाणीव गुन्हेगारास होण्यास मदत होईल.
एस. चैतन्य, पोलिस उपायुक्त

…अशी आहे योजना

– पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवर एक आरोपी एक पोलिस कर्मचाऱ्याला दत्तक देण्यात आला आहे.

– या आरोपीची दैनंदिन माहिती घेणे आणि त्याची नोंद पोलिस त्यांच्याकडील पुस्तिकेत करतात.

– आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांचा फोटो, रोजगाराचे साधन, गुन्ह्यांमधील सहभाग, कौटुंबिक माहितीची नोंद घेणे.

– आरोपी पुन्हा गुन्हा करणार नाही, अशा पद्धतीने त्याच्यावर नियमित लक्ष ठेवणे.

– दिवसभरात कुठे जातो, कुणाशी भेटीगाठी आहेत यावर नजर ठेवली जाते.

– दर पंधरा दिवसांनी यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांना सादर केला जातो.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/each-mumbai-police-to-adopt-a-criminal-for-prevent-crimes-in-mumbai-city-and-maintain-law-and-order/articleshow/80416170.cms