मुंबई बातम्या

कफ परेड ‘झोपु’ योजनेचा मार्ग मोकळा – Loksatta

सात हजार झोपडीधारकांसह शापूरजी पालनजी समूहाला दिलासा

मुंबई : कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळील सात हजार झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा दोन दशकांपासून रखडलेल्या प्रकल्पाला उच्च न्यायालयाने मंगळवारी हिरवा कंदील दाखवला. शापूरजी पालनजी समूहाकडून हा झोपु प्रकल्प राबवण्यात येणार असून न्यायालयाच्या निर्णयाने झोपडीधारक आणि शापूरजी पालनजी समूहालाही दिलासा मिळाला आहे.

शापूरजी पालनजी समूहाची उपकंपनी असलेल्या प्रिकॉशन प्रॉपर्टीज या कंपनीची २८ एकर जागेवरील झोपु प्रकल्पासाठी निवड करण्यात आली होती. त्या निवडीला डायना इस्टेट आणि झोपडीधारकांच्या संघटनेने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या राज्य सरकारच्या तक्रार निवारण समितीकडे आव्हान दिले होते. फेब्रुवारी महिन्यात समितीने शापूरजी पालनजी समूहाची या प्रकल्पासाठी केलेली निवड योग्य ठरवली. त्यामुळे डायना इस्टेटने याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळली.

प्रकल्पासाठी बऱ्याच विकासकांनी प्रस्ताव सादर केले. मात्र त्यातील एकही वैध नव्हता. काही जण योजनेची अंशत: अंमलबजावणी करण्यास तयार होते. मात्र हे व्यवहार्य नव्हते, असे न्यायालयाने निकालात म्हटले, तर प्रिकॉशन प्रॉपर्टीजने पुनर्वसनासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. काही झोपडीधारकांनी प्रस्तावाविरोधात याचिका केल्याने कंपनीचा प्रस्ताव रखडला होता; परंतु ८४ टक्के पात्र झोपडीधारकांच्या सहकारी संस्थांनी कंपनीच्या प्रस्तावाला मान्यता होती. कंपनीची आर्थिक स्थिती लक्षात घेत, हा झोपु प्रकल्प पूर्ण होईल तसेच सगळ्या झोपडीधारकांना घरेही मिळतील, असेही न्यायालयाने नमूद केले.

शापूरजी पालनजी समूहाची हा प्रकल्प पूर्ण करण्याची आर्थिक क्षमता नाही हे सिद्ध करणारे पुरावे याचिकाकर्त्यांना सादर करता आले नाही. झोपडीधारकांची अडचण दूर करण्यासाठी अशा योजना अमलात आणल्या जातात. अनियमितता किंवा न्याय देण्यात अपयश आल्याचे प्रकरण असेल, तर न्यायालयाने हस्तक्षेप करणे योग्य ठरते. मात्र तांत्रिक कारणास्तव प्रकल्पाला रोखता येऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले.

केवळ प्रकल्पाला आणि त्याच्या अंमलबजावणीला मज्जाव करणे हा एकमेव हेतू दिसतो. समितीचा निर्णय रद्द करण्यात आला तर या झोपडीधारकांना पुन्हा अमानुष जीवन जगणे भाग पडेल.

– उच्च न्यायालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on December 24, 2020 2:40 am

Web Title: shapoorji pallonji firm to develop sra project in cuffe parade bombay hc zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/shapoorji-pallonji-firm-to-develop-sra-project-in-cuffe-parade-bombay-hc-zws-70-2363400