मुंबई बातम्या

‘इंडिया टुडे’ला सुनावलेला दंडाचा आदेश रद्द! – Loksatta

मुंबई : कथित प्रेक्षकवाढप्रकरणी ‘इंडिया टुडे’ची मालकीहक्क असलेल्या ‘इंडिया टुडे नेटवर्क’ला ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने (बार्क) पाच लाख रुपयांचा दंड सुनावलेला होता, मात्र हा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

नव्याने सुनावणी घेण्यास तयार असल्याचे ‘बार्क’च्या वकिलाने सांगितल्यानंतर ‘बार्क’च्या शिस्तभंग समितीने ३१ जुलैचा दंड सुनावण्याचा आदेश न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने रद्द केला.

‘बार्क’च्या शिस्तभंग समितीने दंडाचा आदेश दिला त्यावेळी त्यांच्याकडे योग्य ते खंडपीठ उपलब्ध नव्हते, असा दावा कंपनीने केला. तसेच दंडाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली. तर नव्या आचारसंहिता नियमांचा विचार करता ‘बार्क’ची शिस्तभंग समिती नव्याने सुनावणी घेण्यास तयार आहे. कंपनीनेही नव्या सुनावणीसाठी तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने ‘बार्क’चा आधीचा दंडाचा आदेश रद्द केला. तसेच ‘बार्क’च्या शिस्तभंग समितीकडून दिल्या जाणाऱ्या तारखेला कंपनीने आपली बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

‘बार्क’च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश हवे असतील तर कंपनीने पाच लाख रुपयांच्या दंडाची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ही रक्कम कंपनी परत घेऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

झाले काय? : वाहनीच्या अचानक वाढलेल्या प्रेक्षक संख्येवरून ‘बार्क’च्या शिस्तभंग समितीने २७ एप्रिलला कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, मात्र त्याला कंपनीतर्फे समाधानकारक उत्तर न देण्यात आल्याने समितीने कंपनीला पाच लाख रुपयांचा दंड सुनावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on November 8, 2020 3:24 am

Web Title: bombay hc cancel penalty order issued to india today network zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/bombay-hc-cancel-penalty-order-issued-to-india-today-network-zws-70-2323245/