मुंबई बातम्या

वहिनीचा विनयभंग; बॉलीवूड अभिनेत्याच्या भावाला अटकपूर्व जामीन – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

बॉलीवूडमधील एका अभिनेत्याच्या भावाला त्याने वहिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या एफआयआर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला. तक्रारदार ही बॉलीवूडमधील अभिनेत्याची दुरावलेली पत्नी आहे.

‘एफआयआरप्रमाणे विनयभंग झाल्याच्या कथित आरोपाविषयीची मुख्य घटना २०१२मधील आहे. तेव्हापासून यावर्षी १८ जुलै रोजी एफआयआर दाखल करेपर्यंत तक्रारदार महिलेने कधीही तक्रार दाखल केली नाही किंवा त्याविषयी पावले उचलली नाहीत. इतकेच नव्हे, तर आरोपीकडून तिने जुलै-२०१९मध्ये एनईएफटीने पैसेही स्वीकारले. आरोपीविषयी इतके गंभीर आरोप असते, तर तिने ते पैसे स्वीकारले नसते, या आरोपीच्या वकिलांच्या म्हणण्यात तथ्य आहे. त्यामुळे तिने एफआयआरमध्ये कथन केलेली कहाणी संशयास्पद वाटत आहे’, असे निरीक्षण नोंदवून न्या. सारंग कोतवाल यांनी आरोपीला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. ‘आरोपीला अटक केल्यास २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्या रकमेच्या एक किंवा दोन हमीदारांवर सोडावे’, असे न्यायमूर्तींनी आदेशात स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस बोलावतील तेव्हा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, अशी अट आरोपीला घातली.

आरोप-प्रत्यारोप

‘तक्रारदार महिलेची २००३मध्ये आरोपीसोबत आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून अंधेरीत राहणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत ओळख झाली. त्यानंतर ती अभिनेत्यासोबत अनेक वर्षे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिली आणि १७ मार्च २०१० रोजी त्याच्याशी विवाहबद्ध झाली. त्यावेळी आरोपीही त्यांच्यासोबत राहत होता. नंतर काही दिवसांत आरोपीनेही लग्न केले. मात्र, काही महिन्यांतच पत्नीला सोडचिठ्ठी देऊन तो पुन्हा अभिनेत्याच्या घरातच राहू लागला. दोन वर्षांत अभिनेता पतीसोबतचे संबंध बिघडल्यानंतर तक्रारदार २०१२पासून वेगळी राहू लागली. पती तिला पोटगीचे पैसे पाठवत असे. एक दिवस पोटगीचे पैसे घेऊन आरोपी तिच्या गोरेगावमधील घरी आला आणि त्याने तिच्याशी असभ्य वर्तन केले. त्याने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणीही केली. एप्रिल-२०१९मध्ये त्याने पुन्हा तिचा विनयभंग केला’, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. तर ‘आरोपीने तक्रारदार महिलेला व तिच्या कंपनीला वेळोवेळी मोठ्या प्रमाणात पैसे दिले. जवळपास एक कोटी ८४ लाख रुपये दिले. ते पैसे परत मागत असल्यानेच त्याच्यावर दबाव टाकण्यासाठी तिने हा खोटा एफआयआर केला आहे’, असा प्रत्यारोप आरोपीने अॅड. कौशल ठक्कर यांच्यामार्फत केला.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/sexual-harassment-case-bombay-high-court-granted-pre-arrest-bail-to-bollywood-actors-brother/articleshow/79003957.cms