मुंबई बातम्या

Coronavirus: करोना रुग्णांना मुंबई महापालिकेचा मोठा दिलासा – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

खासगी प्रयोगशाळांमध्ये करोना चाचणी करायची असेल तर १,४०० ते १,८०० रुपये मोजावे लागतात. सामान्य नागरिकांना हे दर परवडत नाहीत. यावर महापालिकेने तब्बल २४४ ठिकाणी विनामूल्य चाचण्या करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पालिकेचे सर्व दवाखाने आणि रुग्णालयांत आज, २ नोव्हेंबरपासून या चाचण्या नागरिकांना करता येतील.

करोनाच्या संसर्गावर अधिकाधिक प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. याच उपाययोजनांचा भाग म्हणून करोना चाचण्या करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या पालिकेचे २१ दवाखाने व रुग्णालयांत या चाचण्या करता येतात. तसेच ५४ खासगी प्रयोगशाळांमध्येही आधीपासूनच सशुल्क चाचण्या उपलब्ध आहेत. मात्र ही संख्या कमी असल्याने पालिकेच्या अखत्यारीतील सर्व दवाखाने आणि रुग्णालये अशा आणखी २४४ म्हणजे एकूण ३१९ ठिकाणी चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संभाव्य रुग्ण पालिकेच्या ज्या विभागात राहत असेल, त्याच्या घराजवळ असणाऱ्या चाचणीच्या ठिकाणांची माहिती विभागीय नियंत्रण कक्षांच्या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ‘१९१६’ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होणार आहे. सध्या सुरुवातीला दररोज सकाळी १० ते १२ या कालावधीदरम्यान ही सुविधा ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे. यापैकी काही ठिकाणी आर. टी. पी. सी. आर. पद्धतीची, तर उर्वरित ठिकाणी अँटीजेन चाचणी उपलब्ध असणार आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यास वेळेत निदान होण्यास मदत होणार आहे. परिणामी अधिक प्रभावीपणे करोना संसर्गाला प्रतिबंध करणेही शक्य होणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

ठिकाणांची यादी वेबसाइटवर

पालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये या चाचण्या होणार असून या २४४ ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या ‘१९१६’ या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच http://stopcoronavirus.mcgm.gov.in या पालिकेच्या वेबसाइटवरही यादी उपलब्ध आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-municipal-corporation-has-decided-to-give-free-covid-19-test-service-in-244-place-of-mumbai/articleshow/78985387.cms