मुंबई बातम्या

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मुंबई महापालिकेला मिळाले केवळ ‘इतके’च रुपये… – Sakal

मुंबई : देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत असूनही सरकार आणि देणगीदारांनी मुंबई मनपाला उघड मदत केली नाही. कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पालिकेला गेल्या 4 महिन्यांत अवघ्या 86 कोटींची मदत मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाचा वाटा यात मोठा असून एकूण जमा रक्कमेपैकी 84 टक्के रक्कम त्यांनी दिली आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण याच शहरात आहेत.

कोरोनासाठी मुंबई पालिकेने आतापर्यंत किती रूपये खर्च केले आहेत, शिवाय महापालिकेला  कोणत्या विभागाने किती मदत केली याबाबतची माहीती RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेकडे मागितली होती.

मुंबई पालिकेच्या वित्त विभागाच्या मुख्य कार्यालयाने कोरोना अंतर्गत मिळालेल्या विविध प्रकारच्या निधीची माहिती दिली.

मोठी बातमी – दरवर्षी गिरगाव चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन करतात? आधी विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करा, नाहीतर ऐनवेळी गोंधळ…

मुंबई महापालिकेला गेल्या 4 महिन्यात कोरोनासाठी एकूण 86 कोटी 5 लाख 30 हजार 303 रुपये मिळाले आहेत. या निधीमध्ये मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी 72.45 कोटी रुपये दिले आहेत. ही सर्वात मोठी रक्कम आहे आणि प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी 84 टक्के वाटा आहे. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी 11.45 कोटी जमा केले आहेत. वस्त्रोद्योग मंत्रालयाने केवळ 50 लाख रुपये दिले आहेत. तर खासगी लोकांनी 35.32 लाख रूपयांची मदत पालिकेला केली असून आमदारांकडून केवळ 1.29 कोटी निधीमध्ये जमा झाले आहेत. यामध्ये केवळ 7 आमदारांचा समावेश आहे.

मुंबई पालिकेने कोरोनाच्या एकूण उपचारांसाठी 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. असे असले तरी पालिकेला केंद्र सरकारने अद्याप आर्थिक सहाय्य केलेले नाही. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देखील कोणतीही मदत अद्याप  प्राप्त झालेली नाही. मुंबई महापालिकेच्या तिजोरीत कोरोनासाठी पैसे उभे करण्यासाठी आयुक्त, महापौर, आयएएस अधिकारी आणि नगरसेवकांनी कोणताही पुढाकार घेतला नसल्याची बाब ही समोर आली आहे.

मुंबईतील कोरोऩा रूग्णांचा आकडा हा 1 लाख 12 हजारांच्या वर तर मृतांचा आकडा 6,244 इतका झाला आहे. मुंबईतील परीस्थिती आटोक्यात येत असल्याचं आता पाहायला मिळतंय. मात्र असं असलं तरीही मुंबई उपनगरात अद्यापही बाधीत रूग्ण सापडणे सूरूच आहे. त्यावर पालिकेचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून जुलैपर्यंत मुंबई महापालिकेने 4 हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. अतिरिक्त खर्चामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असून आगामी अर्थसंकल्प 12 हजार कोटी रूपयांनी कमी होणार असल्याचे सांगण्यात येते.

मोठी बातमी – सर्वात श्रीमंत महापालिकेत तयारहोतोय कॉस्ट कटिंगचा आराखडा, BMC अर्थसंकल्प 12 हजार कोटींनी घटणार?

मुंबई शहर हे जरभरातील प्रमुख देशांपैकी एक आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका देखील याच शहराला बसला असून पालिकेची आर्थिक परिस्थिती यामुळे खालावण्याची शक्यता  आहे. त्यामुळे मुंबई पालिकेला सर्वानी मदत करण्याची गरज असून लोकप्रतिनीधींसह सर्व उद्योगपींनी मदत आता मदत करणे गरजेचे असल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.

( संकलन – सुमित बागुल )

BMC received only few crores to fight against corona virus check RTI report

Source: https://www.esakal.com/mumbai/bmc-received-only-few-crores-fight-against-corona-virus-check-rti-report-327861