मुंबई बातम्या

उत्तर मुंबईत पोलीस आक्रमक – Loksatta

नव्याने लागू केलेल्या टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

मुंबई : करोनाचा वेगाने प्रसार होत असलेल्या उत्तर मुंबईतील काही वस्त्यांमध्ये पालिका, पोलिसांनी जारी केलेली ‘पुनश्च टाळेबंदी’ नागरिक धाब्यावर बसवत असल्याने पोलिसांनी कारवाईचा जोर वाढवला आहे. गेल्या पाच दिवसांत पूर्ण मुंबईत टाळेबंदीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ९२१ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ६८ टक्के म्हणजे ६२७ गुन्हे एकटय़ा उत्तर मुंबईतले आहेत. दक्षिण, मध्य, पश्चिम आणि पूर्व मुंबईतील गुन्ह्य़ांची संख्या नगण्य आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर मुंबईतल्या अप्पा पाडा, पिंपरी पाडा या दोन वस्त्यांमध्ये लागण, मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत होता. प्रयोग म्हणून या तेथे सुमारे दहा दिवस पूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम जाणवले. लागण, मृत्यूचे प्रमाण घटले. त्यामुळे हाच प्रयोग उत्तर मुंबईतल्या अन्य वस्त्यांमध्ये राबवण्याचे ठरले. सध्या अंधेरी ते दहिसर दरम्यानच्या ३४ वस्त्यांची यादी तयार असून त्यातील १२ वस्त्यांमध्ये पूर्ण टाळेबंदी लागू आहे. त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकडय़ाही तैनात केल्या आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार विनाकारण भटकणाऱ्यांची संख्या जास्त आढळते. हाती पिशवी घेऊन बाहेर पडायचे, अडवले की किराणा, भाजी, दूध, औषधे घेण्यासाठी बाहेर पडलो, अशी थाप मारायची, या नागरिकांच्या सवयींमुळे टाळेबंदी र्निबध कठोर करावे लागत आहेत.

पुन्हा टाळेबंदी जारी केल्यानंतर त्या त्या वस्त्यांमध्ये पोलिसांनी संचलन केले. शनिवारी पोलिसांचे एक पथक मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोडणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालत होते तेव्हा तेथे पर्यटकांची झुंबड आढळली. त्यात प्रामुख्याने प्रेमी युगुले होती. बहुतांश जोडपी दुचाकीवरून किनाऱ्यावर आली होती. धाक राहावा म्हणून टाळेबंदीसह वाहतुकीचा नियम मोडल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले.

बंदोबस्त, गस्त, जनजागृती या सर्व उपाययोजना सुरू आहेत. मात्र काही केल्या येथे रस्ते, बाजारपेठांमध्ये गर्दी होतच आहे. पोलिसांचे मनुष्यबळ, वेळ खर्च होतो आणि संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे अनेक प्रसंगांत फक्त दम देऊन, समजूत काढून नागरिकांना सोडले जाते, अशी माहिती अन्य एका अधिकाऱ्याने दिली.

खाटा २० हजारांवर

करोना रुग्णांसाठी मुंबईतील रुग्णालयांमध्ये आजघडीला १२ हजार खाटा उपलब्ध आहे. जूनअखेर यामध्ये आणखी काही खाटांची भर पडणार असून एकुण १५ हजार खाटा उपलब्ध होतील. तर ३१ जुलैपर्यंत करोना रुग्णांवरील उपचारासाठी २० हजार खाटा उपलब्ध असतील, अशी माहिती चहल यांनी दिली. त्याचबरोबर सध्या ३६ दिवसांवर आलेला ‘डबलिंग रेट’ ३० जूनपर्यंत ४० वर पोहचेल असा दावाही चहल यांनी यावेळी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 23, 2020 1:30 am

Web Title: police action against those violating the lockdown in north mumbai zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/police-action-against-those-violating-the-lockdown-in-north-mumbai-zws-70-2194455/