मुंबई बातम्या

मुंबईतील नालेसफाई पूर्ण केल्याचा पालिकेचा दावा – Loksatta

मुंबई: शंभर टक्के नालेसफाईचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेने यावर्षी ११३ टक्के गाळ काढल्याचा दावा केला आहे. पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे जेवढे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यापेक्षाही जास्त गाळ काढल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पालिकेची संपूर्ण यंत्रणा करोनाच्या लढाईत गुंतलेली असल्यामुळे यंदा नालेसफाई नीट झालेली नाही, पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार अशी टीका विरोधक करीत होते. परंतु टाळेबंदीमुळे कामगारांअभावी यावर्षी नालेसफाईला उशिरा सुरुवात झाली होती. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तीन पाळ्यांमध्ये काम करण्याचे आदेश दिले होते. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करत महानगरपालिकेच्या यंत्रणेने पावसाळापूर्व कामे पूर्ण केली असल्याची दावा पालिकेने केला आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर नदी-नाल्यांच्या स्वच्छतेसह रस्ते, पदपथ यांची कामेही निर्धारित वेळेत पूर्ण झाली असून सर्व यंत्रणा सुसज्ज आणि सतर्क असल्याचा दावा पालिकेने केला आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यातून २ लाख ५३ हजार ३१६ मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित होते, परंतु यावर्षी त्यापेक्षाही जास्त म्हणजे २ लाख ८७ हजार ५१४.३६ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आणि तो मुंबईबाहेर वाहून नेण्यात आला असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या कामांची सर्व माहिती जीपीएस यंत्रणेद्वारे आणि विशिष्ट संगणकीय पद्धतीने दस्तऐवज स्वरूपात उपलब्ध असल्याचेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शहर भागात गाळ काढण्याची कामे ११९.०३ टक्के, पूर्व उपनगरात ११७.०७ टक्के आणि पश्चिम उपनगरात ११०.५० टक्के अशी सरासरी ११३.५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मुंबईत मोठय़ा पर्जन्यवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन शहरांसाठी १२०, पूर्व उपनगरासाठी १०० आणि पश्चिम उपनगरातील १०५ असे एकूण ३२५ उदंचन पंप मनुष्य बळासह तैनात ठेवले आहेत. नदी-नाल्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून सर्व कामे करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

पर्जन्यवृष्टीच्या कालावधीत मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडणार नाही, अशा रीतीने आवश्यक ती सर्व कामे पूर्ण केली आहेत. महानगरपालिकेने यंदाची पावसाळापूर्व कामे पूर्ण केली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर आणि गैरसमजांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

दावा २२६ टक्के खोटा: आशिष शेलार

मुंबई महापालिका आयुक्तांचा ११३ टक्के नालेसफाईचा दावा २२६ टक्के खोटा असून ही नालेसफाई नसून हातसफाई आहे, अशी टीका भाजपनेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. पहिल्याच पावसात पालिकेचे सगळे दावे वाहून जातात. जर नालेसफाई झाली तर गाळ कुठे टाकला? वजन काटय़ाची आकडेवारी जाहीर का करीत नाही? सीसीटीव्ही चित्रण का जाहीर करीत नाही?, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 15, 2020 12:03 am

Web Title: bmc claims to have completed sewer cleaning in mumbai zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/bmc-claims-to-have-completed-sewer-cleaning-in-mumbai-zws-70-2187462/