मुंबई बातम्या

मुंबई पालिकेच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान – Loksatta

टाळेबंदीत मुंबईतील बाजारांच्या वेळांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. गर्दी उसळत असून त्यामुळे करोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त करत पालिकेचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालयानेही याचिकेत उपस्थित मुद्यांची दखल घेत पालिकेसह राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

कुलाबा येथील बाजार सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेतच सुरू ठेवावीत, असे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांनी पोलिसाना दिले होते. २७ एप्रिलला हे आदेश देण्यात आले होते.

मुंबईतील बहुतांश भागांतील बाजारांसाठी पालिके ने या संदर्भातील आदेश दिले आहेत. त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

अशा आदेशाने बाजारावर अधिक ताण येईल. शिवाय बाजाराच्या वेळांवर निर्बंध घातले गेल्याने गर्दी वाढत आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होण्याचा अधिक धोका असल्याची भीतीही याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे हे आदेश रद्द करून बाजारांच्या वेळांमध्ये वाढ करण्यात यावी किं वा जीवनावश्यक वस्तू घरपोच कराव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

बाजारांच्या वेळांवर निर्बंध आणण्यात येत असल्याने बाजारांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळत आहे. परिणामी सामाजिक अंतर बाळगण्याच्या नियमांचे उल्लंघन होत आहे.

राज्य सरकारलाही भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

केंद्र आणि राज्य सरकारने टाळेबंदीसाठी घालून दिलेल्या नियमांनुसारच मुंबईतील विविध बाजारांच्या वेळांवर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे पालिकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने मात्र याचिकाकर्त्यांंच्या मुद्याची दखल घेत बाजारांच्या वेळा वाढवणे शक्य आहे का, अशी विचारणा करत पालिका आणि राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on May 8, 2020 12:29 am

Web Title: mumbai municipal corporations order challenged in high court abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-municipal-corporations-order-challenged-in-high-court-abn-97-2152918/