मुंबई बातम्या

मुंबई-गोवा महामार्गाचे काम दोन दिवसांत पुन्हा सुरू – Loksatta

टाळेबंदीमुळे बंद पडलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम दोन दिवसांत पुन्हा सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली महामार्गाची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश संबधित यंत्रणांना दिले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप अशा दोन टप्प्यांत हे काम केले जात आहे. टाळेबंदीमुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांना खीळ बसला होता. मात्र टाळेबंदीचा फायदा घेऊन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल नुकताच पाडण्यात आला.

या महामार्गावरील वाहनांची वर्दळ कमी असल्याने हे काम तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच धर्तीवर आता मुंबई-गोवा महामार्गाचे कामही सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक असेलल्या तांत्रिक बाबींची पूर्तता महामार्गाने पूर्ण केली आहे.

सर्व संबधित यंत्रणांना काम सुरू करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.

पळस्पे ते इंदापूर दरम्यान रस्ता डांबरीकरणाचे काम दोन दिवसांत सुरू होणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीची जुळवाजुळव पूर्ण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढे काम मार्गी लावले जाणार आहे.

रस्त्याची काम करताना कामगारांच्या आरोग्याची खबरदारी घेण्याचे निर्देश ठेकेदारांना देण्यात आले आहेत.

महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. दोन दिवसांत काम सुरू होईल. काही ठिकाणी काम सुरू केले आहे.

– प्रशांत फेगडे, कार्यकारी अभियंता, महामार्ग प्राधिकरण

टाळेबंदीच्या काळात महामार्गाचे काम थांबवण्याचे निर्देश दिले नव्हते. आता पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.

-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 10, 2020 12:40 am

Web Title: work on mumbai goa highway resumes in two days abn 97

Source: https://www.loksatta.com/bmc-elections-2017-news/work-on-mumbai-goa-highway-resumes-in-two-days-abn-97-2128163/