मुंबई बातम्या

अमळनेर- मुंबई हेलिकॉप्टर प्रवासात स्‍वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती – Sakal

अमळनेर (जळगाव) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत अमळनेर ते मुंबई दीड तासांचा प्रवास करतांना अमळनेर शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीबाबत सकारात्मक चर्चा झाली. गृहमंत्र्यांनी हिरवा कंदील देऊन पोलीस महासंचालकाकडून माहिती मागविली असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमळनेर दौरा आटोपून हेलिकॉप्टरने मुंबई परतताना आपल्यासोबत आमदार अनिल पाटील यांना सोबत घेतले होते. प्रवासात गृहमंत्र्यासह त्यांचा असिस्टंट व आमदार पाटील हे तीनच जण असल्याने आमदारांनी एकांतवासाची संधी साधत अमळनेर शहराचा वाढता विस्तार, वाढती गुन्हेगारी आणि नागरिक व व्यापाऱ्यांची सुरक्षा आदी मुद्दे उपस्थित करत शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी मागणी केली. याबाबत सविस्तर अहवाल व मागणीपत्र देखील दिले. विशेष म्हणजे अमळनेर येथे पोलीस कॉलनीच्या जागेतच पोलीस ठाण्याची निर्मिती व्हावी व याठिकाणी काही निवासस्थाने देखील व्हावेत; अशी मागणी आमदारांनी केली.

कमी संख्याबळाचाही मुद्दा
सध्याच्या पोलीस ठाण्यात कमी असलेले कर्मचारी संख्याबळ व कमी असलेले अधिकारी याकडे देखील गृहमंत्र्यांचे लक्ष त्यांनी वेधले. तसेच आताचे पोलीस ठाणे शहरापासून तीन किमी अंतरावर असल्याने यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची कशी कसरत होते; हे प्रामुख्याने गृहमंत्री यांच्या लक्षात आणून दिल्याने गृहमंत्र्यांनी देखील लवकरच अमळनेर शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती पूर्ण करण्याचा शब्द दिला. यानंतर लागलीच त्यांच्या ‘पीए’ला सूचना करून पोलीस महासंचालक कार्यालयात सविस्तर माहिती सादर करण्याचा सूचना देखील दिल्या.

पातोंडा पोलीस व चोपडा दुरक्षेत्र निर्मितीची मागणी
पातोंडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दुरक्षेत्र असताना तेथील खोल्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नूतनीकरणाची मागणी होत आहे. तरी याठिकाणी नवीन वास्तू मंजूर करावी आणि चोपडाई कोंडावळ येथे दोन जिल्ह्यांची सीमा असल्याने येथून अनेक गुन्हेगार आणि अवैध बाबींचा प्रवेश होत असतो. तरी याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस दुरक्षेत्र निर्माण करून पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी; अशी मागणी आमदार पाटील यांनी गृहमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात केली. या मागणीला देखील त्यांनी हिरवा कंदील दिला.

संपादन ः राजेश सोनवणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title:

marathi news amalner mumbai travling anil deshmukh helicopter and create new police station

Source: https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-amalner-mumbai-travling-anil-deshmukh-helicopter-and-create-new-police-station