मुंबई बातम्या

हे फक्त मुंबई पोलीस करू शकतात! बलात्कारप्रकरणातील आरोपीला ६ तासांत पकडलं, अन् पीडितेसाठी… – महाराष्ट्र टाइम्स

मुंबई : मुंबईत एका पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी सहा तासांतच १५ वर्षीय आरोपीला अटक केली आणि त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलीच्या भविष्यासाठी नागपाडा पोलिस ठाण्यातील १२हून अधिक पोलिसांनी निधी दिला. ही रक्कम १ लाख १० हजार इतकी असून ती मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेवीसाठी दिली जाणार आहे. तर मुंबई सेंट्रल जवळच्या एका प्रसिद्ध शाळेत या मुलीचे १० पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे.

एका पाच वर्षाच्या मुलीचे ७ जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले होते. शाळेच्या परिसरातील एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख पटवली आणि फक्त ६ तासात त्याला अटक देखील केली. संबंधित अल्पवयीन आरोपीवर POCSO कायद्याची कलमे लावण्यात आली आहे. त्याची रवानगी डोंगरी येथील रिमांड होममध्ये करण्यात आली आहे.

नागपाडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक महेश कुमार ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील मंजूर असून आई गृहणी आहे. हे कुटुंब गरीब असल्याने मी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या बाबत ठाण्यातील सर्व सहकाऱ्यांशी बोललो आणि त्याने देखील मदत करण्याचे ठरवले. १०० ते काही हजार रुपये अशी मदत दिली आणि १ लाख १० हजार रुपये जमा झाले. आता पीडित मुलीच्या नावाने मुदत ठेव सुरू करणार आहोत. ही रक्कम मुलीच्या नावाने ठेवण्यासाठी आम्ही पालकांना मुलीचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करण्यास सांगितले आहे, असे ठाकूर म्हणाले.

वाचा- IND vs NZ 1st T20:पराभवाला कोण जबाबदार? हार्दिकने नाव घेतले नाही, पण व्यक्ती सर्वांना कळाली

नागपाडा पोलिस ठाण्यातील अधिकारी सोमनाथ काळे यांनी काही तासात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारचा गुन्हा उघडकीस आणला आणि आरोपीला देखील केली. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, आम्ही सर्ववांनी मुलीला आधार देण्यासाठी निधी दिली आहे. तिच्या नावाने मुदत ठेव सुरू करू जेणे करून मुलीच्या कुटुंबाला दर वर्षी व्याज मिळेल आणि तिच्या शिक्षणासाठीच्या खर्चाचा प्रश्न निर्माण होणार नाही. या मुलीच्या शिक्षणासाठी एका प्रसिद्ध खाळेच्या अध्यक्षांशी संपर्क साधला आणि त्यांनी तिला १०वी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले. इतक नाही तर संबंधित मुलीला त्याच्या कॉलेजमधून पदवीचे शिक्षण देखील विनामूल्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले.

पोलिसांचे हे काम कौतुकास्पद आहे. हे काम एक खासगी स्वरुपात आहे. पण या गोष्टी संस्थात्मक झाल्या पाहिजेत. लहान मुलांवरील अत्याचारासाठी निधी उपलब्ध झाला तर चांगले ठरेल. यासाठी पोलिस खासगी कंपन्यांशी संपर्क करू शकतात. अशा प्रकारची उदाहरणे स्वागतार्ह आहेत.
– वाय पी सिंग, माजी आयपीएस अधिकारी

प्रजासत्ताक दिनानिमित्त डीसीपी अकबर पठाण यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली. या भेटीत मुलीच्या शाळेतील प्रवेशासाठीची कागदपत्रे देण्यात आली. ही मुलगी आमच्या कुटुंबातील सदस्यासारखी आहे. तिला जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही मदत करू, असे पठाण म्हणाले. मुलीच्या वडिलांनी टाइम्सशी बोलताना म्हटले की, मी दिवसाला ३०० ते ४०० रुपये कमावतो. घरी पत्नी आणि चार मुले आहेत. पोलिसांनी आम्हाला मदत केली आहे. मुलीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी त्यांनी घेतली आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiuAFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL3JhcGUtb2YtZml2ZS15ZWFyLW9sZC1naXJsLW11bWJhaS1wb2xpY2UtY3JhY2tlZC1pdC13aXRoaW4tc2l4LWhvdXJzLWFuZC1zdXBwb3J0LXRoZS1jaGlsZHMtcmVoYWJpbGl0YXRpb24vYXJ0aWNsZXNob3cvOTczOTI0ODIuY21z0gG8AWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3MvcmFwZS1vZi1maXZlLXllYXItb2xkLWdpcmwtbXVtYmFpLXBvbGljZS1jcmFja2VkLWl0LXdpdGhpbi1zaXgtaG91cnMtYW5kLXN1cHBvcnQtdGhlLWNoaWxkcy1yZWhhYmlsaXRhdGlvbi9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTczOTI0ODIuY21z?oc=5