मुंबई बातम्या

नवी मुंबई : फ्लॅटमधून गुटखा विक्री, विक्रेत्यावर कारवाई – Loksatta

राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखू सुपारी विक्रीवर बंदी असतानाही नवी मुंबईसारख्या शहरात कुठून कुठून गुटखा विक्री होईल सांगता येत नाही. अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून नुकतेच बोनकोडे परिसरातील एका सदनिकेतून गुटखा विक्रीवर कारवाई करण्यात आली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

राज्यात गुटखा विक्रीला बंदी असल्याने थेट पान टपरीवर तर गुटखा विकणे शक्य नाही. मागणी असल्याने गुपचूप विक्री जोरात आहे. कधी किराणा दुकानावर तर कधी छोट्या मोठ्या जनरल स्टोअर्समध्ये गुटखा विक्री केल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या एका कारवाईत एका सदनिकेतून गुटखा विक्री होत असल्याचे समोर आले.

हेही वाचा – तांदूळ ओढणारी मशीन असल्याचे भासवून दोघांची २० लाखांची फसवणूक

हेही वाचा – आमदार निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ, चोरट्यांनी हिसकावला महिलेचा सोन्याचा हार

कोपरखैरणे सेक्टर १२ बोनकोडे गाव परिसरात असलेल्या पितृछाया इमारतीतील एका सदनिकेतून गुटखा विक्री आणि वितरण होत असल्याची माहिती पोलीस हवालदार रमेश तायडे यांना मिळाली होती. त्या आधारे छापा टाकून या ठिकाणी ४६  हजार ६००  रुपयांचा गुटका जप्त करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत महापे येथील श्रीकृष्ण अपार्टमेंट सदनिका क्रमांक ५ येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पराग सोनावणे यांना मिळाली होती. याही ठिकाणी छापा टाकला असता १ लाख २२ हजार ३८० रुपयांचे विविध कंपनींचे गुटखे आढळून आले. त्यात विमल, रजनीगंध, बी वन, तुलसी अशा कंपनींचे गुटखे जप्त करण्यात आले. अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद बशीर अली यांनी दिली.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMieGh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9uYXZpbXVtYmFpL2d1dGtoYS1zYWxlLWZyb20tZmxhdC1pbi1uYXZpLW11bWJhaS1hY3Rpb24tdGFrZW4tYWdhaW5zdC10aGUtc2VsbGVyLXNzYi05My0zNDI2NjM4L9IBfWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9uYXZpbXVtYmFpL2d1dGtoYS1zYWxlLWZyb20tZmxhdC1pbi1uYXZpLW11bWJhaS1hY3Rpb24tdGFrZW4tYWdhaW5zdC10aGUtc2VsbGVyLXNzYi05My0zNDI2NjM4L2xpdGUv?oc=5