मुंबई बातम्या

दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ! सामना मुंबई-महाराष्ट्राचा, पण आंध्र प्रदेशला – ABP Majha

Mumbai vs Maharashtra Ranji Trophy : रणजी क्रिकेट स्पर्धेत (Ranji Trophy) मुंबई आणि महाराष्ट्र (Mumbai Vs Maharashtra) यांच्यातील सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय. दोन्ही संघाचा डाव समान धावसंख्येवर आटोपलाय. त्यातच फक्त एका दिवसाचा खेळ बाकी आहे. जर सामना अनिर्णित राहिला तर याचा फायदा आंध्र प्रदेश संघाला होणार आहे. दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ, या म्हणीप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील लढतीचा फायदा आंध्र प्रदेशला होणार आहे. पण अखेरच्या दिवशी महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील सामन्याचा निकाल लागला तर विजेता संघ पुढील फेरीत प्रवेश करणार आहे.

पाहूयात नेमकं गणित काय आहे? How can Andhra qualify ahead of Mumbai and Maharashtra?

महाराष्ट्र आणि मुंबई या दोन्ही संघाची पहिल्या डावात समान धावसंख्या झाली आहे. पहिल्या डावात दोन्ही संघानी 384 धावाच केल्या आहेत. सध्या पॉईंट टेबलमध्ये मुंबईचा संघ 23 गुणांवर आहे तर महाराष्ट्राचा संघ 25 गुणावर आहे. या दोन्ही संघातील सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण मिळणार आहे. त्यामुळे मुंबईला 24 तर महाराष्ट्र 26 अंकावर जाणार आहे. मुंबईचे आव्हान संपुष्टात येईल. तर आंध्र प्रदेश, सौराष्ट्र (जर तामिळनाडूविरुद्ध हरली तर) आणि महाराष्ट्र या संघांचे गुण समान होतील. पण एलिट ग्रुप बी मध्ये आंध्र प्रदेश आणि सौराष्ट्र या संघांनी एक सामना बोनस गुणांसह जिंकला आहे. त्यामुळे त्या निकषावर तिन्ही संघांचे गुण समान असले तरी महाराष्ट्राचं आव्हान संपुष्टात येईल. आंध्र प्रदेश आणि सौराष्ट्र हे संघ पुढील फेरीत पोहचतील. पण अखेरच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील सामन्याचा निकाल लागला तर विजेता संघ पुढील फेरीत प्रवेश करणार आहे.

सामन्यात सध्याची स्थिती काय?

केदार जाधव याचं दमदार शतक तसेच  सौरभ नवले (58) आणि अक्षय पालकर (66) यांच्या अर्धशतकाच्या बळावर महाराष्ट्राने पहिल्या डावात 384 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल मुंबईची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली होती. 200 धावांच्या आत मुंबईचा आघाडीचे पाच फलंदाज बाद झाले होते. पण प्रसाद पवार याचं दमदार शतक आणि तनुष कोटीन याच्या 93 धावांच्या बळावर मुंबईने 384 धावांपर्यंत मजल मारली… तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राने दोन गड्याच्या मोबदल्यात 52 धावा केल्या आहेत. शुक्रवारी म्हणजेच अखेरच्या दिवशी दोन्ही संघाला विजयासाठी मैदानात उतरावे लागणार आहे. पण हा सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाचं आव्हान संपुष्टात येईल.. आंध्र प्रदेश संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरणार आहे. 

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMimQFodHRwczovL21hcmF0aGkuYWJwbGl2ZS5jb20vc3BvcnRzL2NyaWNrZXQvcmFuamktdHJvcGh5LW11bWJhaS1tYWhhcmFzaHRyYS10aWUtb24tZmlyc3QtaW5uaW5ncy1oYW5kLWFuZGhyYS1jaGFuY2UtZm9yLXF1YXJ0ZXJmaW5hbC1xdWFsaWZpY2F0aW9uLTExNDU1NzXSAZ0BaHR0cHM6Ly9tYXJhdGhpLmFicGxpdmUuY29tL3Nwb3J0cy9jcmlja2V0L3JhbmppLXRyb3BoeS1tdW1iYWktbWFoYXJhc2h0cmEtdGllLW9uLWZpcnN0LWlubmluZ3MtaGFuZC1hbmRocmEtY2hhbmNlLWZvci1xdWFydGVyZmluYWwtcXVhbGlmaWNhdGlvbi0xMTQ1NTc1L2FtcA?oc=5