मुंबई बातम्या

डॉक्टर तरुणी मुंबईतील रस्त्यावर विपन्नावस्थेत – Loksatta

वसई : परदेशात वैद्यकीय पदवी संपादन केलेल्या हरियाणातील एक तरुणी मुंबईतील एका रस्त्यावर विपन्नावस्थेत आढळली होती. मॉडेलिंगच्या ध्यासापायी ती घर सोडून मुंबईत आली होती. त्यात तिला यश न आल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडली होती. ती रस्त्यावर निर्जन स्थळी राहू लागली होती. विरारमधील जीवन आनंद संस्थेत तिला पोलिसांनी आणून सोडले. तिथे तिची तिच्या कुटुंबीयांची भेट घडवून दिली.

मे २०२२ मध्ये गोरेगाव पोलिसांना रस्त्यावर एक तरुणी विपन्नावस्थेत आढळून आली. तिच्या शरीरावर काही ठिकाणी जखमांही झाल्या होत्या. पोलिसांनी तिला बोरिवलीतील चौगुलेनगर येथील ‘आश्रय निवारा केंद्रा’त आणून सोडले. मात्र डिसेंबर २०२२ मध्ये ती तेथून पळून गेली.  ती पुन्हा सापडल्यानंतर तिचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. विरार येथील जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमात आणण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या सदस्यांनी तिच्यावर उपचार करून तिचे समुपदेशन केले. कॅरोलिना कपूर (४२) तरुणीचे नाव आहे. समुपदेशकांनी संवाद साधल्यानंतर तिने त्रोटक माहिती दिली.  विविध माध्यमे पोलिसांकरवी तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला.  हरियाणातील गुडगाव येथून ती बेपत्ता असल्याचे समजले. संस्थेने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क केला. संस्थेच्या आदिती ग्वुईन, उज्वला जाधव, भाईदास माळी, दीपक अडसुळे, वैशाली काकड, दीपाली मेघा-माळी, चंदा छेत्री, सचिन पडते, शिवानी शेंगाळे यांनी तिची काळजी घेतली. संस्थेच्या सदस्यांनी माझ्यासाठी खूप काही केले. मी  बरी झाल्यानंतर आश्रमात येऊन सेवा करीन, असे तिने म्हटले आहे.

मॉडेलिंगचे स्वप्न भंगले

कॅरोलिना डॉक्टर आहे. परदेशातही तिने वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. स्थानिक पातळीवर सौंदर्य स्पर्धेत भाग घेत असल्याने तिला मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावण्याची इच्छा होती. त्यासाठी ती मुंबईत आली. परंतु त्यात तिला अपयश आले.  याच काळात तिचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला आणि ती विपन्नावस्थेत रस्त्यावर फिरू लागली. परंतु नंतर तिची कुटंबीयांशी भेट झाल्याची माहिती जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांनी दिली. 

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMidWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS92YXNhaXZpcmFyL21lZGljYWwtZGVncmVlLWhvbGRlci13b21hbi1saXZlcy1pbi1wb3ZlcnR5LW9uLXN0cmVldHMtb2YtbXVtYmFpLXp3cy03MC0zNDIzNjQ2L9IBemh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS92YXNhaXZpcmFyL21lZGljYWwtZGVncmVlLWhvbGRlci13b21hbi1saXZlcy1pbi1wb3ZlcnR5LW9uLXN0cmVldHMtb2YtbXVtYmFpLXp3cy03MC0zNDIzNjQ2L2xpdGUv?oc=5