मुंबई बातम्या

एक लाखात पासपोर्ट आणि व्हिसा; अंधेरी परिसरात बनावट कागदपत्रांसह दोघांना अटक – महाराष्ट्र टाइम्स

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अंधेरी परिसरात छापा टाकून बनावट पासपोर्ट, व्हिसा बनवून देणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २८ जणांच्या नावाने तयार केलेले बनावट पासपोर्ट, विविध देशांचे २४ व्हिसा तसेच हे बनविण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले. एक ते पाच लाख रुपयांत ही टोळी एजंटमार्फत पासपोर्ट आणि व्हिसाची विक्री करत असून त्यांनी दिलेल्या बनावट पासपोर्टवर अनेक जण परदेशात गेल्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्याची शहानिशा केली जात आहे.

असा आहे प्रकार

अंधेरीच्या डी. एन. नगर मेट्रो स्थानकाच्या जवळ असलेल्या शिवशक्ती सोसायटीमधील एका खोलीमध्ये पासपोर्ट, व्हिसा, बनावट लसीकरण प्रमाणपत्र, तसेच इतर सरकारी कागदपत्रे तयार करून दिली जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे सहायक निरीक्षक अमोल माळी यांना मिळाली. याची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलिस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद येरेकर, अजित गोंधळी, माळी, उपनिरीक्षक बेंडाळे यांच्या पथकाने सोसायटीमधील या खोलीमध्ये छापा टाकला. येथे बनावट पासपोर्ट आणि व्हिसाचा छापखानाच थाटण्यात आला होता. या ठिकाणी असलेल्या इम्तियाज अली शेख उर्फ राजू भाई आणि सुधीर सावंत या दोघांना ताब्यात घेतले. पुरेशी कागदपत्रे नसलेल्या गरजूंना बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे पासपोर्ट, व्हिसा तसेच इतर प्रमाणपत्रे बनवून दिली जात असल्याची माहिती या दोघांनी दिली. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

मोठा साहित्य साठा हस्तगत

पोलिसांनी शिवशक्ती सोसायटीमधील खोलीतून २८ पासपोर्ट, १६ व्यक्तींच्या पासपोर्टच्या पहिल्या पानाची कलर प्रिंट, २४ व्हिसा, विविध देशांच्या इमिग्रेशन विभाग, पासपोर्ट अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विविध रुग्णालये, सरकारी अधिकाऱ्यांचे सुमारे ४०० रबरी शिक्के, वेगवेगळ्या बँकांच्या नावांचे ४० शिक्के, मोबाइल, दोन कम्प्युटर, तीन कलर प्रिंटर, स्कॅनर, सात पेन ड्राइव्ह, चांगल्या प्रतीचे कागद, पासपोर्ट बांधण्यासाठी लागणारा दोरा तसेच इतर बरेच साहित्य हस्तगत केले.

तुरुंगातून बाहेर येताच पुन्हा छपाई

इम्तियाज अली शेख याच्यावर देशात वेगवेगळ्या ठिकाणी बनावट पासपोर्ट प्रकरणात अनेक गुन्हे दाखल आहेत. सन २०२२मध्ये दिल्लीत इम्तियाज याला अटक झाली होती. काही दिवस तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर होता. पुन्हा दिल्लीत बनावट पासपोर्ट रॅकेट चालविल्यास पकडले जाण्याची भीती असल्याने त्याने इतर साथीदारांच्या मदतीने मुंबईत हा धंदा सुरू केला. या टोळीमागे एजंटची मोठी साखळी सक्रिय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiwFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL3R3by1vZi1nYW5nLW1hZGUtZmFrZS1wYXNzcG9ydHMtYW5kLXZpc2FzLWFycmVzdGVkLWluLWFuZGhlcmkvYXJ0aWNsZXNob3cvOTczMzUyNzYuY21z0gGPAWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3MvdHdvLW9mLWdhbmctbWFkZS1mYWtlLXBhc3Nwb3J0cy1hbmQtdmlzYXMtYXJyZXN0ZWQtaW4tYW5kaGVyaS9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTczMzUyNzYuY21z?oc=5