मुंबई बातम्या

जामिनावर सुटका, २० वर्षे मुंबई पोलिसांना चकवा; चोरट्याला पडकण्यासाठी ‘शिक्षकी’ सापळा रचला अन्… – Maharashtra Times

मुंबई: गेल्या २० वर्षांपासून फरार असलेल्या एका चोराला मुंबई पोलिसांनी नाट्यमयरित्या अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अत्यंत हुशार असलेल्या या चोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी सापळा लावला होता. त्यासाठी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी शिक्षकांचा वेष धारण करुन या चोराच्या गावात गेले. गेल्या अनेक वर्षांपासून हा चोर पोलिसांपासून वाचण्यासाठी मोबाईल फोन वापरत नव्हता. तसेच आपले कोणतेही ओळखपत्र त्याने या काळात वापरले नव्हते. त्यामुळे या चोराला पकडणे अवघड काम होते. परंतु, मुंबई पोलिसांच्या पथकाने पाळत ठेऊन अखेर या चोराच्या मुसक्या आवळल्या. मुंबईच्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.

२००३ साली राजू परड उर्फ राजू बुवा याने परळच्या जे.व्ही. नाईक ज्वेलर्सवर दरोडा टाकला होता. राजू परड याने दुकान फोडून सोने-चांदीचे दागिने आणि रोकड पळवली होती. याप्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. परंतु, जामीन मिळाल्यानंतर राजू परड तुरुंगातून बाहेर आला. यानंतर तो फरार झाला होता. राजू परड याने शिवडी येथील आपले घर विकून टाकले होते. त्यानंतर राजू परड कोर्टातील एकाही सुनावणीसाठी हजर राहिला नव्हता. त्यामुळे भोईवाडा न्यायालयाने राजू परड याच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते. परंतु, गेल्या २० वर्षांपासून राजू परड पोलिसांना चकवत होता.
ज्वेलरी शॉपच्या बाजूनं दुकान भाड्यानं घेतलं, बोगदा खणून घुसला; पण भलताच गेम झाला
गेल्या २० वर्षांच्या काळात राजू परड याने पोलिसांपासून वाचण्यासाठी योग्य ती सर्व खबरदारी घेतली होती. राजू परड याने मोबाईल वापरणे थांबवले होते. तसेच या काळात राजू परड याने आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र यापैकी एकाही कागदपत्रासाठी अर्ज केला नव्हता. याशिवा, राजू सातत्याने आपल्या राहण्याची ठिकाणं बदलत होता. एकूण राजूने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागणार नाही, याची व्यवस्थित काळजी घेतली होती. राजू परड याच्या पत्नीच्या नावावर एक रेशनकार्ड होते, पण त्यावर राजूचे नाव नव्हते. त्याची पत्नी मोबाईल फोन वापरत होती. परंतु या मोबाईलचे सीमकार्ड संगमनेरमधील पांडे नावावर होते. त्यामुळे राजूचा माग काढणे अशक्य झाले होते. परंतु, गेल्याच आठवड्यात मुंबई पोलिसांनी परभणीच्या अकोली गावातील एका लाँजवर जाऊन राजू परडला ताब्यात घेतले.

पोलिसांनी राजूला कसं पकडलं?

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील फरार गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राक पोलीस ठाण्यातील कर्मचारी कामाला लागले. यावेळी पोलिसांना राजू परड याच्याबाबत माहिती मिळाली. राजू शिवडीतील घर विकून त्याच्या खेडमधील गावात गेला होता, असे पोलिसांना समजले. तेव्हा पोलिसांनी राजूला पकडायचे ठरवले. त्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक महेश लमखेडे यांनी शिक्षक प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्याचा वेष धारण केला. कॉन्स्टेबल नारायण कदम हे त्यांचे वरिष्ठ म्हणून गावात गेले. तर पोलीस कर्मचारी रवींद्र साबळे मुख्याधापक आणि बळवंत दळवी कारकून म्हणून राजूच्या संगमनेर येथील गावात पोहोचले. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हे सर्वजण याठिकाणी आले.
रिक्षातून फोन चोरला, बडे अधिकारी निवसरकरांकडून फिल्मी पाठलाग, अखेर चोरट्याला धरलाच!
याठिकाणी पोलिसांच्या पथकाने प्रशिक्षणाच्या नावाखाली राजूच्या गावातील सामाजिक संस्था आणि इतर लोकांना भेटायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना राजूची पत्नी एका शेतावर काम करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी काहीकाळ तिच्यावर पाळत ठेवली. यानंतर स्थानिक पोलीस आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने पोलिसांनी राजूच्या पत्नीशी संपर्क साधला. राजूला पकडण्यात सहकार्य केले नाही तर तुझ्यावर कारवाई करू, असा दम पोलिसांनी तिला भरला. त्यानंतर राजूच्या पत्नीने सगळी माहिती द्यायला सुरुवात केली.

राजूच्या पत्नीने तो काही दिवसांपूर्वी एका हॉटेलमध्ये कामाला असल्याचे सांगितले. त्याठिकाणी गेल्यानंतर राजू परडने नोकरी सोडून दिल्याचे पोलिसांना समजले. तो जुन्नरला निघून गेल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी हॉटेल मालकाची कसून चौकशी केली. त्याने पोलिसांना राजूचा ठावठिकाणा सांगितला. त्यानुसार पोलिसांनी १७ जानेवारीला राजू परड याला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiswFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL21haGFyYXNodHJhLWNyaW1lLW5ld3MtcG9saWNlLXRyYWNrLWFic2NvbmRpbmctYnVyZ2xhci1hZnRlci0yMC15ZWFycy1jb3BzLXBvc2UtYXMtYS10cmFpbmVlLXRlYWNoZXJzL2FydGljbGVzaG93Lzk3MjIxMzI0LmNtc9IBtwFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL21haGFyYXNodHJhLWNyaW1lLW5ld3MtcG9saWNlLXRyYWNrLWFic2NvbmRpbmctYnVyZ2xhci1hZnRlci0yMC15ZWFycy1jb3BzLXBvc2UtYXMtYS10cmFpbmVlLXRlYWNoZXJzL2FtcF9hcnRpY2xlc2hvdy85NzIyMTMyNC5jbXM?oc=5