मुंबई बातम्या

सत्तासंघर्षानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईत, मोदींच्या हस्ते मायानगरीत बम्पर लोकार्पणाचे कार्यक्रम! – News18 लोकमत

मुंबई, 10 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकांची चाहूल लागताच भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत, याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 19 जानेवारीला पंतप्रधानांचा मुंबई दौरा असणार आहे. या दौऱ्यात मोदींच्या हस्ते महापालिकेच्या वेगवेगळ्या कामांचा शुभारंभ होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते तीन रुग्णालयं, मलनिस्सारण प्लांट, सिमेंट-काँक्रिटचे रस्ते, पंतप्रधान स्वनिधी योजना, अशा विविध कामांचा शुभारंभ होणार आहे. आपली चिकित्सा योजनेअंतर्गत भांडूप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ओशिवारा प्रसुतीगृह, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय यांच्या पुनर्विकासाचं काम पूर्ण झालं आहे.

मलनिस्सारणचे 7 प्लांट, मुंबईत होणारे 400 किमीचे सिमेंट-काँक्रिटचे रस्ते, 1,750 कोटी रुपये खर्चून मुंबईचं सौंदर्यीकरण, अशा वेगवेगळ्या 500 हून अधिक कामांचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणाऱ्या मलनिस्सारण प्लांटची किंमत 26 हजार कोटी रुपये आहे. एक लाख फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत 10 हजार रुपये कर्ज, अशा एकूण 12 प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींच्या या दौऱ्यात मुंबई मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात लवकरचं प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.मात्र त्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची मानली जातेय. जवळपास तीन दशकं मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र युती तुटल्यानंतर भाजपनं मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गेल्यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला जोरदार टक्कर दिली होती. आता भाजपला मुख्यमंत्री शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची साथ मिळणार आहे, त्यामुळे यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक रंगतदार होणार आहे. महापालिका निवडणूकी पूर्वी मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून राजकीय वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMifmh0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vbXVtYmFpL3BtLW5hcmVuZHJhLW1vZGktdG8tdmlzdGktbXVtYmFpLXRvLWluYXVndXJhdGUtYm1jLXByb2plY3RzLWJlZm9yZS1lbGVjdGlvbnMtbWhzZC04MTI0NTUuaHRtbNIBggFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL2FtcC9tdW1iYWkvcG0tbmFyZW5kcmEtbW9kaS10by12aXN0aS1tdW1iYWktdG8taW5hdWd1cmF0ZS1ibWMtcHJvamVjdHMtYmVmb3JlLWVsZWN0aW9ucy1taHNkLTgxMjQ1NS5odG1s?oc=5